नागरिकांच्या समस्या प्राधान्याने मार्गी लावा
By Admin | Updated: October 15, 2016 01:37 IST2016-10-15T01:37:48+5:302016-10-15T01:37:48+5:30
दैनंदिन प्रशासकीय कामात दिरंगाई न करता कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्राधान्याने

नागरिकांच्या समस्या प्राधान्याने मार्गी लावा
अहेरी : दैनंदिन प्रशासकीय कामात दिरंगाई न करता कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्राधान्याने कमी वेळात मार्गी लावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपविभागातील अधिकाऱ्यांना दिले. महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या नियोजनाबाबत शुक्रवारी अहेरीच्या नगर पंचायत कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी बैठकीला अहेरीचे तहसीलदार एस. एन. सिलमवार, संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री आत्राम यांनी मुद्रा लोन, अपंगांच्या समस्या, घरकूल लाभार्थ्यांच्या अडचणी, कर्ज वाटप, परवाना, सिंचन समस्या, विविध प्रकारची दाखले, कृषी साहित्य वाटप, वीज समस्या, विद्यार्थ्यांसाठीची एसटी पास योजना, वनहक्क पट्टे, रस्ते, आरोग्य सुविधा याबाबतची माहिती घेतली. तसेच आदिवासी विकास प्रकल्पाच्या योजनांची अंमलबजावणी, अपंगांना तीनचाकी सायकल वाटप आदींचाही आढावा त्यांनी घेतला. पुढील महिन्यात महसूल विभागातर्फे अहेरी येथे महाराजस्व अभियान घेण्यात येणार आहे. या शिबिरात अहेरी उपविभागातील जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, तसेच काही नवीन योजना अंमलात आणाव्या, असे निर्देश पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी दिले. सदर बैठकीचे आभार तलाठी चांदेकर यांनी केले. अहेरी उपविभागातील एकूण १६ हजार ३८३ लाभार्थ्यांना समाधान शिबिराचा लाभ देण्यात आल्याबद्दल पालकमंत्री आत्राम यांनी महसूल व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. सदर आढावा बैठकीला समाजकल्याण, वन, कृषी, पंचायत समिती, उपप्रादेशिक परिवहन, भूमी अभिलेख, आरोग्य, आदिवासी विकास प्रकल्प, विद्युत, विविध राष्ट्रीयकृत बँक तसेच एसटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)