दुग्ध व्यवसायातून साधली प्रगती
By Admin | Updated: August 15, 2015 00:24 IST2015-08-15T00:24:06+5:302015-08-15T00:24:06+5:30
दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोडत असलेल्या हलवरे या गावातील शेतकरी कारू डोगा पुंगाटी यांनी अंधश्रद्धेला झुगारून म्हशी पालनाचा व्यवसाय सुरू केला.

दुग्ध व्यवसायातून साधली प्रगती
हलवरे या दुर्गम गावातील शेतकरी : अंधश्रद्धेला झुगारून कारू पुंगाटीने केले म्हशींचे पालन
भामरागड : दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोडत असलेल्या हलवरे या गावातील शेतकरी कारू डोगा पुंगाटी यांनी अंधश्रद्धेला झुगारून म्हशी पालनाचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून त्यांनी प्रगती साधली आहे. या परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी त्यांच्या माध्यमातून एक चांगले उदाहरण प्राप्त झाले आहे.
जनावरांचे दूध काढून ते विकल्यास आपल्या कुटुंबाला नजर लागते व आपल्या कुटुंबाचे बरेवाईट होते. अशी अंधश्रद्धा भामरागड तालुक्यातील विशेषत: हलवरे परिसरातील आदिवासी समाजामध्ये आहे. या अंधश्रद्धेमुळे या परिसरातील कोणताच आदिवासी शेतकरी दूधाचा व्यवसाय करण्यास समोर येत नाही. दूध व्यवसाय करू इच्छीणाऱ्यासाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी त्यांचा लाभ शेतकरी वर्गाकडून घेतला जात नाही. विशेष करून आदिवासी समाजाला सुमारे ७५ टक्के सुटीवर दूधाळ जनावरे उपलब्ध करून दिली जातात. मात्र या अंधश्रद्धेच्या भीतीपोटी या परिसरातील एकाही शेतकऱ्याने योजनेचा लाभ घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला नाही.
या अंधश्रद्धेला मात्र हलवरे गावातील सुशिक्षित शेतकरी कारू डोगा पुंगाटी हा अपवाद ठरला. नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत २५ टक्के रक्कम भरून त्याने म्हशींची उचल केली. सदर म्हशींची अत्यंत चांगल्या पद्धतीने पालन-पोषण करून दूधाचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे सहापेक्षा अधिक म्हशी आहेत. सभोवतालच्या गावांमध्ये दूध विकून महिन्याकाठी हजारो रूपये कमावित आहेत. प्रगतीचे साधन म्हशीच्या रूपाने त्यांना मिळाले आहे. इतर समाजाच्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या माध्यमातून चालना मिळण्यास मदत होणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
सवलतीवर मिळतात दुधाळ जनावरे