समस्यांमुळे आठवडी बाजारात विक्रेत्यांना त्रास
By Admin | Updated: March 30, 2015 01:30 IST2015-03-30T01:30:53+5:302015-03-30T01:30:53+5:30
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या गडचिरोली येथील आठवडी बाजारात संपूर्ण जिल्हाभरातील तसेच चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील अनेक विक्रेते वस्तू विक्रीसाठी येतात.

समस्यांमुळे आठवडी बाजारात विक्रेत्यांना त्रास
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या गडचिरोली येथील आठवडी बाजारात संपूर्ण जिल्हाभरातील तसेच चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील अनेक विक्रेते वस्तू विक्रीसाठी येतात. या बाजारात ग्राहकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असते. जिल्ह्यातील प्रमुख सर्वात मोठा बाजार म्हणून या आठवडी बाजाराकडे पाहिले जाते. सध्या लग्नसराई असल्यामुळे गडचिरोली परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक रविवारच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी येत असतात. विक्रेते व ग्राहकांची संख्या पाहाता आठवडी बाजारासाठी जागा कमी पडत असल्याचे दिसून येते. यामुळे अनेक विक्रेत्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या बाजारातील अनेक विक्रेते नालीच्या कडेला बसून आपला व्यवसाय करीत आहेत. विक्रेत्यांसाठी सिमेंट ओटे तसेच रस्त्यावर काँक्रीटीकरण करण्यात आले नाही. बाजार परिसरातील सर्वच नाल्या तुटलेल्या अवस्थेत असून सांडपाण्याने व कचऱ्यांने तुडूंब भरल्या आहेत. अशा नालीलगतच अनेक विक्रेते दुकान लावून वस्तूची विक्री करीत आहेत.
बाजारात नगर पालिका प्रशासनाच्यावतीने कसलेही नियंत्रण नाही. यामुळे दिवसभर मोकाट जनावरांचा हैदोस असतो. ही मोकाट जनावरे संपूर्ण बाजारभर फिरून अनेक विक्रेत्यांचा भाजीपाला फस्त असतात. यामुळे विक्रेत्यांचे नुकसानही होत आहे. याशिवाय ग्राहकांनाही सदर जनावराचा त्रास होत आहे. मात्र या मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकडे न.प. प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
स्वतंत्र जागेअभावी भाजीपाल्याच्या या आठवडी बाजारालगतच मटन मार्केट आहे. न.प. प्रशासनाकडून मटन मार्केटमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने संपूर्ण बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या बाजारात विक्रेते व ग्राहकांसाठी सार्वजनिक शौचालय व मुत्रीघर नाही. त्यामुळे अनेक विक्रेते व ग्राहक रस्त्याच्या कडेलाच लघुशंका करीत असतात. येथील जुने शौचालय व मुत्रीघराची दूरावस्था आहे. नवीन सुलभ शौचालय वर्षभरापासून कुलूपबंद आहे. यामुळे मुतारी व शौचाची समस्या बिकट आहे.