जनसंवादात मांडल्या समस्या
By Admin | Updated: February 5, 2015 23:10 IST2015-02-05T23:10:28+5:302015-02-05T23:10:28+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या शंकरनगर, पाथरगोटा, रवी, शिवणी, अरसोडा या पाच गावातील एकाही अंगणवाडी केंद्रात बालकांचे वजन करण्यासाठी वजन काटे नाहीत.

जनसंवादात मांडल्या समस्या
वैरागड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या शंकरनगर, पाथरगोटा, रवी, शिवणी, अरसोडा या पाच गावातील एकाही अंगणवाडी केंद्रात बालकांचे वजन करण्यासाठी वजन काटे नाहीत. तसेच या गावांमधील किशोरींना आहार दिला जात नसल्याची तक्रार वैरागड येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात करण्यात आली.
आरोग्य सेवा व लोक आधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व देखरेख नियोजन समिती वैरागड, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आरमोरी पंचायत समितीचे उपसभापती चंदू वडपल्लीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य लक्ष्मी मने, तालुका देखरेख व नियोजन समिती सदस्य शालिनी गेडाम, सुनीता कुथे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. मोटे, डॉ. व्ही. के. वाघधरे, डॉ. खोब्रागडे, मुख्याध्यापक विजय समर्थ, प्रा. प्रदीप बोडणे उपस्थित होते.
मलेरिया वर्कर, आशा यांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने लहानसहान आजारावरही वेळेवर औषधोपचार होऊ शकत नाही. परिणामी परिसरातील किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी होत नाही, अशी तक्रार जनसंवाद कार्यक्रमात करण्यात आली. शंकरनगर येथील किचन शेडची दुरूस्ती करण्यात यावी, अरसोडा उपकेंद्रातील आरोग्य सेवकाचे रिक्त पद भरण्यात यावे, तसेच अरसोडा उपकेंद्राचे बांधकाम करावे, पाथरगोटा, रवी या अंगणवाड्यांमधील किचन शेडचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या प्रमुख शुभदा देशमुख, संचालन विजयालक्ष्मी वघारे तर आभार आशा भारती यांनी मानले. यशस्वीतेसाठी नूतन लाऊतकर, दिनेश किरंगे, माया कोचे, आशा तुलावी, अमृत शास्त्रकार यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)