आमदारांनी जाणल्या रुग्णांच्या समस्या

By Admin | Updated: July 5, 2015 01:44 IST2015-07-05T01:44:46+5:302015-07-05T01:44:46+5:30

स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाला आ. क्रिष्णा गजबे यांनी गुरूवारी आकस्मिक भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

The problems of patients who are known by the MLAs | आमदारांनी जाणल्या रुग्णांच्या समस्या

आमदारांनी जाणल्या रुग्णांच्या समस्या

आरमोरी रुग्णालयाला भेट : वैद्यकीय अधीक्षकांशी केली व्यवस्थेवर चर्चा
आरमोरी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाला आ. क्रिष्णा गजबे यांनी गुरूवारी आकस्मिक भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान भरती रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व वैद्यकीय अधीक्षकांशी व्यवस्थेबाबत चर्चा केली.
रुग्णालय भेटीदरम्यान आ. क्रिष्णा गजबे यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जेवण पुरवठा, डॉक्टरांची रिक्तपदे तसेच एकूणच व्यवस्थेबाबत माहिती घेतली. यावेळी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह एकच डॉक्टर असल्याचेही निदर्शनास आले. याबाबत त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवई यांची विचारणा केली असता, काही डॉक्टर प्रशिक्षणाकरिता बाहेर गेले असल्याने एकच डॉक्टर आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे, असे सांगितले. दरम्यान, आ. क्रिष्णा गजबे यांच्यासमोर अनेक रुग्णांनी रुग्णालयातील असुविधांचा पाढा वाचला.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून रुग्णालयात डॉक्टरांच्या नियुक्तीबाबत निर्देश देण्यात येतील, असे सांगितले. तसेच भरती झालेल्या रुग्णांना योग्य आरोग्य सोयीसुविधांसोबतच शुद्ध पिण्याचे पाणी, औषधी व निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश आ. गजबे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान गजबे यांनी रुग्णालयातील अनेक वॉर्डांची पाहणी केली व रुग्णांशी मनमोकळेपणे संवाद साधला.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवई, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, राहुल तितीरमारे, रोहीत धकाते, रिंकू बोडे, निंबेकार उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The problems of patients who are known by the MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.