खासदारांसमोर रूग्णांनी वाचला समस्यांचा पाढा
By Admin | Updated: January 1, 2015 23:01 IST2015-01-01T23:01:05+5:302015-01-01T23:01:05+5:30
खासदार अशोक नेते यांनी ३० डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयाला आकस्मिक भेट दिली असता, रूग्णालयातील रूग्णांनी खासदारांसमोर रूग्णालयातील अनेक समस्या मांडल्या.

खासदारांसमोर रूग्णांनी वाचला समस्यांचा पाढा
गडचिरोली : खासदार अशोक नेते यांनी ३० डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयाला आकस्मिक भेट दिली असता, रूग्णालयातील रूग्णांनी खासदारांसमोर रूग्णालयातील अनेक समस्या मांडल्या. त्याचबरोबर डॉक्टरही अनुपस्थितीत असल्याचे आढळून आले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशारा खासदार अशोक नेते यांनी दिला.
संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा भार गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयावर अवलंबून आहे. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातीलही काही रूग्ण या रूग्णालयात दाखल होतात. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी रूग्णांकडे दुर्लक्ष करून स्वत:चेच दवाखाने चालविण्यात मग्न आहेत. दिवसाची एखादी फेरी मारून मोकळे होतात. डॉक्टरच राहत नसल्याने येथील परिचारिका, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिले नाही. या सर्व बाबी माहित झाल्यानंतर खासदार अशोक नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली व रूग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल विचारणा केली असता, रूग्णांनी रुग्णालयातील समस्या खासदारांच्या लक्षात आणून दिल्या. रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकही परिचारिका वार्डात उपस्थित नव्हती. काही रुग्णांना रक्तांची आवश्यकता असल्याने त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी दोन दिवसापूर्वी रक्त जमा करूनही रक्तपेढीने रक्त दिले नाही.
येथील सोयीसुविधांच्या अभावामुळे तसेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेक गर्भवती महिला, बाल रूग्ण, नवजात बालकांना आपले प्राण गमवावे लागते. ही बाब अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा खासदारांनी दिला. त्याचबरोबर रुग्णालयाला नवीन यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याबरोबरच विशेष तज्ज्ञांची नियुक्ती करण्यासाठी केंद्र व राज्यशासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदारांनी दिले.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री रेखा डोळस, प्रतिभा चौधरी, लता पुंघाटे, विलास भांडेकर यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)