राज्यमंत्र्यांनी जाणल्या आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या समस्या
By Admin | Updated: December 15, 2014 22:56 IST2014-12-15T22:56:42+5:302014-12-15T22:56:42+5:30
शिक्षक परिषद संघटनेच्यावतीने ११ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. उपोषणस्थळाला आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भेट

राज्यमंत्र्यांनी जाणल्या आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या समस्या
गडचिरोली : शिक्षक परिषद संघटनेच्यावतीने ११ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. उपोषणस्थळाला आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. व प्रशासनाला सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तरीही समस्या मार्गी न लागल्याने आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांच्या मागील वर्षीच्या बदल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ करण्यात आला. २२० शिक्षकांच्या नियमबाह्यपणे बदल्या करण्यात आल्या.
याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र १० महिन्यांचा कालावधी लोटूनही एकाही दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही. सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून चालविला जात आहे. या नियमबाह्य बदल्यांमुळे ४ हजार ५०० शिक्षकांवर अन्याय झाला आहे. अतिरिक्त होण्याच्या भीतीने स्वत:ची बदली करवून घेतली आहे. या विरोधात शिक्षक परिषद संघटनेने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. उपोषण स्थळाला आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी भेट घेऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.
सदर समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राज्यमंत्र्यांनी दिले. मात्र दोन दिवस लोटूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे सदर आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू आहे. १४ डिसेंबर रोजी आमदार प्रा. अनिल सोले यांनीसुद्धा भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.
पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे. मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा शिक्षक परिषदेचे विभागीय सहकार्यवाहक सत्यम चकीनारप, विभागीय उपाध्यक्ष नत्थुजी पाटील, रसीक बुद्धे, जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, यशवंत शेंडे, खांडेकर यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)