कमी दाबाच्या विजेची समस्या गंभीर
By Admin | Updated: May 14, 2017 01:40 IST2017-05-14T01:40:17+5:302017-05-14T01:40:17+5:30
राज्यभरात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर उन्हाळी धानपिकासाठी मोठ्या प्रमाणात

कमी दाबाच्या विजेची समस्या गंभीर
कृषिपंपांचा वापर वाढला : दुर्गम व ग्रामीण भागातील जनता त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यभरात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर उन्हाळी धानपिकासाठी मोठ्या प्रमाणात कृषी पंपांचा वापर होत असल्याने गडचिरोली जिल्ह्यात कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक वीज उपकरणे सुरू होत नसल्याने किंवा सुरू झाले तरी पूर्ण शक्तीनिशी काम करीत नसल्याने जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
उष्णतामानात वाढ होताच विजेची मागणी राज्यभरात वाढली आहे. वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी वीज विभाग प्रयत्न करीत असतानाच काही ठिकाणचे वीज निर्मिती संयंत्र बंद पडल्याने विजेचे उत्पादन घसरले आहे. मागणी व पुरवठ्यातील समतोल साधण्यासाठी वीज विभागाच्या मार्फतीने प्रयत्न केले जात आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ८५ हजार वीज ग्राहक आहेत. गडचिरोली डिव्हिजनमध्ये १ लाख १० हजार व आलापल्ली डिव्हिजनमध्ये ७५ हजार वीज ग्राहक आहेत. गडचिरोली जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्याने या जिल्ह्यात भारनियमन न करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. अपवाद वगळता वीज वितरण कंपनी या आदेशांचे पालनही करीत आहे. मात्र विजेची मागणी वाढल्याने दुर्गम व ग्रामीण भागात कमी दाबाचा वीज पुरवठा होण्याची समस्या वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्याचा व्याप अतिशय मोठा आहे. वीज उपकेंद्रापासून ७० ते ८० किमी अंतरावर आहेत. एवढ्या दूर विजेचा पुरवठा केल्याने विजेची गळती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दुर्गम भागातील शेवटच्या टोकावर कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वीज ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
उन्हाळी धानासाठी वीजेची मागणी वाढली
यावर्षी चांगला पाऊस झाला असल्याने सिरोंचा, कुरखेडा, आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. या पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचे कृषीपंप रात्रंदिवस चालत असल्याने वीज वाहिणीवर प्रचंड लोड आला आहे. परिणामी वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाणही यावर्षी प्रचंड प्रमाणात वाढले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत भारनियमन बंद आहे. आकस्मिक स्थिती जरी भारनियमन केले गेले तरीही ते सायंकाळी ६ वाजतानंतर व सकाळी ६ वाजतानंतर कधीच केले जात नाही. गडचिरोली जिल्ह्यात वीज वितरण वाणिज्य हानीचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे.
- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली
सरासरी ७० मेगावॅट वीजेचा वापर
गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांची संख्या कमी आहे. लोकसंख्या विरळ आहे. शहरी लोकसंख्याही तुलनेने कमी आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात विजेचा वापर कमी केला जातो. दिवसाला सरासरी ७० मेगा वॅट वीज लागते, अशी माहिती वीज विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वीज वितरण वाणिज्य हानीच्या प्रकारानुसार भारनियमन केले जाते. भारनियमनाचा सर्वप्रथम फटका ‘ग’ प्रवर्गात मोडणाऱ्या भागाला बसतो. या प्रवर्गामध्ये ६१ ते ७६ टक्के वीज हानी होते. त्यानंतर प्रवर्ग ‘फ, ई, ड’ मध्ये भारनियमन केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात प्रवर्ग ‘ग’ चा भूभाग नाही. त्यामुळेही भारनियमनाचा सर्वप्रथम फटका गडचिरोली जिल्ह्याला बसत नाही.