एटापल्लीतला खासगी दवाखाना होता गर्भपात केंद्र

By Admin | Updated: March 13, 2015 00:09 IST2015-03-13T00:09:25+5:302015-03-13T00:09:25+5:30

डॉक्टर म्हणजे देवदूत असा समज सर्वसामान्य लोकांचा आहे. अनेक लोक डॉक्टरांना देवाच्या स्थानीच मानतात. वैद्यकीय व्यवसाय हा सेवाभावी व्यवसाय समजल्या जातो.

A private dispensary at Etapally, the abortion center | एटापल्लीतला खासगी दवाखाना होता गर्भपात केंद्र

एटापल्लीतला खासगी दवाखाना होता गर्भपात केंद्र

गडचिरोली : डॉक्टर म्हणजे देवदूत असा समज सर्वसामान्य लोकांचा आहे. अनेक लोक डॉक्टरांना देवाच्या स्थानीच मानतात. वैद्यकीय व्यवसाय हा सेवाभावी व्यवसाय समजल्या जातो. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीच्या महिला कंत्राटी डॉक्टरने या व्यवसायाला कलंक फासला आहे.
राज्यात मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवस कमी होत आहे. गडचिरोली जिल्हा मात्र सुदैवाने याबाबत राज्यात अग्रस्थानी आहे. एटापल्ली येथे शालेय बाल आरोग्य तपासणी कार्यक्रमात कंत्राटी सेवेत असलेल्या डॉ. वर्षा खापर्डे या २००३ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात रूजू झाल्या होत्या. त्यांच्याकडे शालेय बाल आरोग्य तपासणीचे काम देण्यात आले होते. मागील तीन महिन्यांपासून १०८ क्रमांकाच्या फिरत्या पथक अभियानाचेही वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. या दोनही सेवेतून त्यांना मानधन दिले जात होते. याशिवाय या महिला वैद्यकीय अधिकारी आपला स्वतंत्र खासगी व्यवसायही एटापल्लीसारख्या गावात थाटून होत्या. या दवाखान्याच्या माध्यमातून त्यांनी गर्भपात करून देण्याचे केंद्रच सुरू केले, असावे असा पोलीस यंत्रणेचा दावा आहे.
एटापल्ली पोलिसांनी जानेवारी २०१५ मध्ये दोन अर्भक सापडल्यानंतर ज्या कसोशीने तपास केला व याप्रकरणाचे सत्य उजेडात आणले, त्यासाठी एटापल्ली पोलिसांचेही कौतुक करण्याची गरज आहे. दुर्गम भागात पोलीस यंत्रणा एखाद्या संवेदनशील प्रश्नाचा किती तत्परतेने तपास करू शकते, हे पोलिसांनी या प्रकरणात दाखवून दिले आहे. जानेवारी २०१५ मध्ये एकेरा नाल्यात बेवारस अर्भक मिळाले होते. दोन महिने तपास यंत्रणा कामी लागली व सत्य शोधून काढले.
वैद्यकीय अधिकारी म्हणून खापर्डे यांनी असल्या घाणेरड्या प्रकारांना थारा देण्याची गरज नव्हती. मात्र पैशाच्या हव्यासापोटी खापर्डे यांनी हा सारा खटाटोप केला. मागील महिन्यातही एका महिलेला खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याचे एक प्रकरण पुढे आले होते. मात्र यात खापर्डे यांच्या काही सहयोगी डॉक्टरांनी तक्रारकर्त्यालाच तक्रार मागे घ्यायला लावून या प्रकरणावर पडदा पाडला होता. मात्र १०० अपराध भरल्यावर कुणीही माफ करीत नाही, असे म्हणतात. असाच काहीसा प्रकार खापर्डे यांच्याबाबत झाला. राज्यात मुलींची संख्या वाढविण्यासाठी गर्भपात रोखण्यावर भर दिले जात आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींचे जन्मदर वाढावे, यासाठी देशव्यापी अभियान सुरू केले आहे. असे असताना अनैतिक कृत्यात सहभागी होणाऱ्या या महिला डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी मानवाधिकार संघटनेचे एटापल्ली तालुकाध्यक्ष मनोहर बोरकर, बाजीराव मेश्राम आदींनी केली आहे. तसेच एटापल्ली तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या बोगस डॉक्टरांचाही छडा यंत्रणेने लावावा, अशी मागणी मानवाधिकार संघटनेने केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: A private dispensary at Etapally, the abortion center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.