उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ११ शेतकऱ्यांचा गौरव

By Admin | Updated: July 2, 2015 02:09 IST2015-07-02T02:09:24+5:302015-07-02T02:09:24+5:30

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन ...

The pride of 11 farmers who made remarkable performance | उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ११ शेतकऱ्यांचा गौरव

उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ११ शेतकऱ्यांचा गौरव

पालकमंत्र्यांचे आवाहन : जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा
गडचिरोली : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन व कृषी जनजागृती सप्ताह शुभारंभाच्या कार्यक्रमात करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी रणजीतकुमार, कृषी विभाग उपसंचालक विजय कोळेकर, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते पडीत जागेवर सुबाभूळची शेती, भातपिकाच्या शेतीसाठी रोवणी यंत्राचा वापर, शेळी व भाजीपाला उत्पादन करणारे तसेच यांत्रिकीकरणाद्वारे भात रोवणी व श्रीपद्धतीने भाताची रोवणी करणाऱ्या पुरूष व महिला शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रंसगी पालकमंत्री आत्राम म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात भरपूर प्रमाणात पाणी आहे. मात्र जिल्ह्याच्या पाणी स्त्रोतातून शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाच्या वतीने विविध शासकीय योजना राबवूनही दुर्गम भागातील शेतकरी दरवर्षी दुष्काळाचा सामना करतो. पुरेशा प्रमाणात सिंचन सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. याकरिता पाच वर्षांचा सिंचन सुविधेचा सूक्ष्म आराखडा तयार करणे गरजेचे आहे व असा आराखडा तयार करण्याच्या कार्यवाहिला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविली असून येत्या काही महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातही कृषी क्षेत्राच्या विकासाचा व सिंचन सुविधेचा आराखडा तयार होईल, असेही पालकमंत्री आत्राम म्हणाले.
सन्मानित झालेल्या आदर्श शेतकऱ्यांचा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी आदर्श घेऊन कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करावी, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जि. प. सीईओ संपदा मेहता यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, संचालन चंद्रकांत ठाकरे यांनी केले तर आभार एस. टी. पठाण यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
कृषी कर्मचाऱ्यांकडून गावागावांत जनजागृती
कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ ते ७ जुलैदरम्यान कृषी विभागाचे कर्मचारी १२ ही तालुक्यात गावागावात जाऊन कृषी योजना व धोरणाबाबत जनजागृती करणार आहेत, अशी माहिती डॉ. कुडमुलवार यांनी दिली.
या शेतकऱ्यांचा झाला गौरव
कृषीदिन कार्यक्रमात पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये चंद्रशेखर रामदास मुरतेली रा. पारडी ता. गडचिरोली, भास्कर श्रीराम वैद्य रा. शिवणी बुज ता. आरमोरी, सुहांगणा हिरालाल प्रधान रा. पिंपळगाव (हलदी) ता. देसाईगंज, खुशाल वासुदेव गुरनुले रा. बेतकाठी ता. कोरची, रेखा कृष्णा गावतुरे रा. बेडगाव घाट ता. कोरची, उदाराम बळीराम क वाडकर रा. नवरगाव ता. कुरखेडा, गजानन भुरसे रा. मेंढाटोला ता. धानोरा, मोरेश्वर गंगाधर चरडे रा. चंदनवडी ता. चामोर्शी, मीना बिचंगा सिडाम रा. मल्लमपल्ली, बंडू चिन्ना लेकामी रा. मल्लमपल्ली ता. एटापल्ली, सिरय्या पेंटा गावडे रा. गरखापेठा ता. सिरोंचा आदींचा समावेश आहे.

Web Title: The pride of 11 farmers who made remarkable performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.