शेतमजुरांचे भाव वधारले
By Admin | Updated: November 26, 2015 01:18 IST2015-11-26T01:18:18+5:302015-11-26T01:18:18+5:30
खरीप हंगामाच्या धान कापणीला दिवाळीनंतर गडचिरोली जिल्ह्यात वेग आला आहे. प्रत्येक शेतकऱ्याची धान कापणी व बांधणीसाठी लगबग सुरू झाल्याने या कामाकरिता मजूर मिळण्यास अडचण येत आहे.

शेतमजुरांचे भाव वधारले
महिलांना रोज १०० रूपये : तर पुरूष मजुराला दिवसाला पडतात ३०० रूपये
गडचिरोली : खरीप हंगामाच्या धान कापणीला दिवाळीनंतर गडचिरोली जिल्ह्यात वेग आला आहे. प्रत्येक शेतकऱ्याची धान कापणी व बांधणीसाठी लगबग सुरू झाल्याने या कामाकरिता मजूर मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे वाढीव रक्कम देऊन कापणी व बांधणीसाठी शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध करून घ्यावे लागत आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे खरीप हंगामाचे प्रमुख पीक धान असून जिल्ह्यात हलक्या व मध्यम प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. त्याची कापणी दिवाळीनंतर सुरू होते. यंदा पाऊस उशिरा झाल्यामुळे धान रोवणीलाही उशीर झाला. त्यामुळे कापणीही उशिराच सुरूवात झाली. मजुरांची गावागावात शेतकऱ्यांना टंचाई जाणवू लागल्याने अनेक ठिकाणी आपले वाहन पाठवून शेतकऱ्यांना मजूर आणावे लागत आहे. महिला मजुरांना धान कापणीसाठी १०० रूपये प्रतिदिवस मजुरी द्यावी लागत आहे. तर शेती कामाचा पुरूष मजुराचा दिवस १५० रूपये असला तरी धान कापणीचे काम मात्र १६ किलो धान एका दिवसाला याप्रमाणे केले जाते. त्यामुळे एका पुरूष मजुराला किमान ३०० रूपये रोज पडतात.
यंदा नापिकी असतानाही शेतकऱ्यांकडून मोठी रक्कम मजूर टंचाईमुळे मजुरांच्या पदरात पडत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)