आत्मसमर्पणासाठी पोलिसांकडून दबाव
By Admin | Updated: September 14, 2015 01:15 IST2015-09-14T01:15:39+5:302015-09-14T01:15:39+5:30
वैयक्तिक कारणांमुळे काही नक्षली नक्षल चळवळ सोडून घरी परतले आहेत. त्यांच्या घरी जाऊन पोलीस त्यांच्यावर आत्मसमर्पणासाठी दबाव आणत आहेत.

आत्मसमर्पणासाठी पोलिसांकडून दबाव
धोरणावर टीका : पत्रकातून नक्षल्यांचा आरोप
गडचिरोली : वैयक्तिक कारणांमुळे काही नक्षली नक्षल चळवळ सोडून घरी परतले आहेत. त्यांच्या घरी जाऊन पोलीस त्यांच्यावर आत्मसमर्पणासाठी दबाव आणत आहेत. वेळप्रसंगी त्यांच्यावर अत्याचारही करीत आहेत. असे भाकपा (माओवादी) सचिव भास्कर याने दुर्गम भागात टाकलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
पोलीस विभागाने आत्मसमर्पण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नक्षल चळवळ सोडून गेलेल्या सदस्यांवर दबाव टाकला जात आहे. आत्मसमर्पितांना त्यांच्या गावाकडे जाऊ दिले जात नाही. त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिले जात नाही. गुलामाप्रमाणे गडचिरोली किंवा अहेरी शहरात ठेवले जाते. यामुळे आत्मसमर्पितांच्या जीवन जगण्याच्या अधिकारावरच गदा आली आहे. यालाच नवजीवन म्हणायचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. हे नवजीवन नसून नवदमन असल्याचेही नक्षलपत्रकात म्हटले आहे. हिंसा व अत्याचाराच्या विरोधात संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी आत्मसमर्पितांनी मुक्तीची लढाई लढली पाहिजे. परिवार व जनता यांच्या खांद्याला खांदा मिळवून अस्तित्वाची लढाई लढली पाहिजे. पोलिसांकडून विविध प्रकारचे खोटी आश्वासने दिली जातात. त्यांना बळी पडू नये, असे सुध्दा नक्षल्यांनी म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)
हिडामीवरील गोळीबाराचा निषेध
२५ आॅगस्ट रोजी सायंकाळी मुरकुटी जंगलात सी- ६० पथकाने बोंडे गावातील आदिवासी शेतकरी कमलसिंग हिडामी याच्यावर गोळीबार करून त्याला जखमी केले. त्यानंतर हिडामीला अटक करून नक्षलवादी घोषित केले. या घटनेचा भाकपा (माओवादी) संघटना निषेध करीत आहे, असे कोरची उपकमांडर जगदीश यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
नैनवाडी येथील उमेश मट्टामी हा पोलिसांना मदत करीत होता. पैशाच्या लालसेने तो नक्षल्यांची माहिती पोलिसांना देत असल्याचेही म्हटले आहे.