व्यावसायिकांकडून पॉलिथिन जप्तीच्या मोहिमेवर नगराध्यक्ष
By Admin | Updated: December 24, 2015 01:55 IST2015-12-24T01:55:55+5:302015-12-24T01:55:55+5:30
प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाला तसेच जनावरांना हानी पोहोचते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर थांबविण्यात यावा, यासाठी पालिका प्रशासनाने अनेकदा प्रयत्न केले.

व्यावसायिकांकडून पॉलिथिन जप्तीच्या मोहिमेवर नगराध्यक्ष
शेकडो क्विंटल पॉलिथिन जप्त : गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा पुढाकार
गडचिरोली : प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाला तसेच जनावरांना हानी पोहोचते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर थांबविण्यात यावा, यासाठी पालिका प्रशासनाने अनेकदा प्रयत्न केले. परंतु त्याला यश आले नाही. अखेरीस बुधवारी गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव यांनी गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या पुढाकाराने मोहीम राबवून विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्यांकडून शेकडो क्विंटल पॉलिथिन बॅग जप्त केल्या.
गोंडवाना सैनिकी विद्यालय मागील वर्षीपासून पॉलिथिन बंदीसाठी पुढाकार घेऊन आहे. यापूर्वीही या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेकदा व्यापाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करून पॉलिथिन वापर बंद करा, असे सांगितले होते. गेल्या महिन्यात गडचिरोली नगर पालिकेने चार ते पाच दिवस शहरात ध्वनीक्षेपक लावून व्यापाऱ्यांना पॉलिथिनचा वापर थांबवा, अशी विनंती केली होती. १ जानेवारी २०१५ पासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, खर्रा पन्न्या आदी वापरावर बंदी घातली असताना याचा काहीही परिणाम दिसून येत नव्हता. पालिका प्रशासनाने ५०० रूपये दंड करण्यात येईल, असेही सूचविले होते. परंतु त्यानंतरही वापर थांबला नाही. अखेरीस गोंडवाना सैनिकी विद्यालय, मराठी विज्ञान परिषद गडचिरोली व नगर पालिका गडचिरोली यांनी संयुक्त मोहीम राबवून बुधवारी धडक कारवाई केली.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर, नगर पालिकेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख संतोषवार व सैनिकी शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडी बाजार या मार्गावरील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानातून पन्न्या व प्लास्टिक जप्त करून नेण्यात आले व या सर्वांना प्लास्टिक बंदीबाबत सूचना पत्रही वितरित करण्यात आले. दुकानांवर या संदर्भात स्टिकर्स सुद्धा चिपकविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)