जिल्ह्यात बीएएमएस डॉक्टरांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करा
By Admin | Updated: August 1, 2016 01:29 IST2016-08-01T01:29:13+5:302016-08-01T01:29:13+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या रुग्णालयात डॉक्टरांची पदे भरण्याकरिता जाहिरात देऊनही जिल्हाबाहेरील डॉक्टर येण्यास तयार नाही.

जिल्ह्यात बीएएमएस डॉक्टरांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करा
पालकमंत्र्यांची सूचना : बैठकीत आरोग्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या रुग्णालयात डॉक्टरांची पदे भरण्याकरिता जाहिरात देऊनही जिल्हाबाहेरील डॉक्टर येण्यास तयार नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. जिल्ह्याच्या रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी बीएएमएस डॉक्टर नियुक्तीकरण्यासाठीच्या नियमात बदल करण्याकरिता प्रस्ताव तत्काळ सादर कराव्या, अशा सूचना आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची सभा पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी बैठकीला आ. क्रिष्णा गजबे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, डॉ. अप्पलवार, डॉ. कुंभारे आदी उपस्थित होते.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, गरीब प्रवर्गातील लोकांसाठी असलेल्या आरोग्य योजना, संबंधित संस्था करतात किंवा नाही, याचा आढावा घेण्याचे काम सदर समिती करीत असते. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचा कायापालट करणे, वैद्यकीय अधिकारी कंत्राटी स्वरूपात उपलब्ध करणे, आरोग्य सुविधेसाठी निधीची मागणी आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)
कंत्राटी पद्धतीवर स्वच्छता कर्मचारी नेमा
दवाखान्यात पुरेसा आहार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी नायक यांनी बीपीएलच्या दरात धान्य पुरवठा करून देण्याचे बैठकीत मान्य केले. प्रत्येक आरोग्य केंद्रात स्वच्छता राखण्याची आवश्यकता आहे. मात्र केंद्रात स्वच्छक पदाला मान्यता नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने स्वच्छता कर्मचारी नेमून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.