मकरंद अनासपुरेच्या उपस्थितीत होणार व्यसनमुक्ती दिन
By Admin | Updated: January 17, 2017 00:43 IST2017-01-17T00:43:08+5:302017-01-17T00:43:08+5:30
मराठी चित्रपट कलावंत मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत दारू व तंबाखूमुक्तीसाठी संकल्प व तंबाखूजन्य पदार्थाची होळी करून ...

मकरंद अनासपुरेच्या उपस्थितीत होणार व्यसनमुक्ती दिन
गडचिरोलीत जाहीर सभा : विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन
गडचिरोली : मराठी चित्रपट कलावंत मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत दारू व तंबाखूमुक्तीसाठी संकल्प व तंबाखूजन्य पदार्थाची होळी करून मुक्तीदिन १८ जानेवारी २०१७ रोजी धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ३ ते ५ या वेळात साजरा करण्यात येणार आहे.
लोकांमध्ये दारू व तंबाखूच्या व्यसनाबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी व कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांचा व्यसनाला नाही म्हणण्याचा सामुहिक संकल्प व्हावा, हा मुख्य उद्देश या कार्यक्रमामागे आहे, अशी माहिती मुक्तीपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. कार्यक्रमाचे आयोजन मुक्तीपथ गडचिरोली, जिल्हा परिषद शिक्षण विभाग गोंडवाना विद्यापीठ यांच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाला गडचिरोली तालुक्यातील इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी व मुक्तीपथचे कार्यकर्ते हजर राहणार आहेत. शाळेचे विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात रॅली काढून शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानात एकत्रित येत असून सोबत शाळेच्या आजुबाजुला पडलेले तंबाखूजन्य पदार्थाचे पाऊच व रॅलीमध्ये बॅनर लावून सायकल रथ आणणार आहेत. या मैदानावर उपस्थितांना मकरंद अनासपुरे मार्गदर्शन करतील व तेथेच तंबाखूजन्य पदार्थाची सामुहिक होळी केली जाईल, अशी माहिती सावळकर यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)