शहर विकास आराखडा तयार
By Admin | Updated: January 17, 2015 01:32 IST2015-01-17T01:32:44+5:302015-01-17T01:32:44+5:30
नगर रचना विभागाने गडचिरोली शहराचा पुढील २० वर्षांसाठीचा विकास आराखडा तयार केला असून सदर आराखड्यास नगर सचिवांची मंजुरी मिळाल्यानंतर शहराचा सुनियोजित विस्तार केला जाणार आहे.

शहर विकास आराखडा तयार
दिगांबर जवादे गडचिरोली
नगर रचना विभागाने गडचिरोली शहराचा पुढील २० वर्षांसाठीचा विकास आराखडा तयार केला असून सदर आराखड्यास नगर सचिवांची मंजुरी मिळाल्यानंतर शहराचा सुनियोजित विस्तार केला जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर गडचिरोली येथे अनेक कार्यालये आली. कार्यालयामध्ये काम करणारे हजारो अधिकारी व कर्मचारी गडचिरोली येथे वास्तव्यास राहू लागले. परिणामी गडचिरोली शहराची लोकसंख्या १९८१ नंतर झपाट्याने वाढायला लागली. शहराचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी गडचिरोली शहराचा १९९१ साली पहिला शहर विकास आराखडा तयार करण्यात आला होता. सदर आराखड्याची मुदत २०११ साली संपली. मागील वर्षीपासून नगर रचना विभागाने शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले होते. विकास आराखडा तयार करणे अत्यंत किचकट बाब आहे. नगर रचना विभागाकडून संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पुढील २० वर्षांमध्ये शहराची लोकसंख्या किती प्रमाणात वाढेल, यासाठी शासकीय कार्यालयांना किती जागा आरक्षित ठेवावी लागेल, घर बांधकामासाठी व शासकीय कार्यालयांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागेमध्ये पूर येतो काय याची शहानिशा करण्यात आली आहे. त्यानुसारच रहिवासी, शासकीय कार्यालये यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. शहराच्या नवीन विकास आराखड्यामध्ये शहराच्या सभोवतालच्या शेत जमिनीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र खासगी मालकीची शेत जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नगर परिषदेमध्ये स्वतंत्र सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आल्यानंतर नगर रचना विभागाने शहराच्या विकासाचा कच्चा आराखडा नकाशाच्या स्वरूपात तयार केला आहे. सदर आराखडा नगर परिषद कार्यालयात नागरिकांना बघण्यासाठी ठेवण्यात आला आहे.
नगर विकास आराखडा तयार करण्यासाठी नगर परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या देखरेखीखालीच नगर विकास आराखड्याची रचना नगर विकास विभागाने केली आहे.
या नगर विकास आराखड्यास गडचिरोली नगर परिषदेने मंजुरी दिली असून सदर आराखडा आता अंतिम मंजुरीसाठी राज्याच्या नगर रचना सचिवांकडे पाठविला जाणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर सदर विकास आराखड्यास अंतिम स्वरूप प्राप्त होऊन त्यानुसार पुढील २० वर्षांपर्यंत याच आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्द विस्तार केला जाणार आहे.
विसापूर-नवेगाव मार्गावर सर्वाधिक विस्तार
शहराच्या उत्तर दिशेला कठाणी नदी आहे. पूर्व व दक्षिणेला वनविभागाचे आरक्षित जंगल आहे. त्यामुळे या भागात शहराच्या विस्ताराला वाव नाही. परिणामी नवीन विकास आराखड्यात नवेगाव, कोटगल, विसापूर परिसरातील शेतजमिनींचा समावेश करण्यात आला आहे. परिणामी यापुढेही शहराचा विस्तार याच भागाकडे होण्याची शक्यता आहे. या भागात आगामी काळात जमिनीचे भाव वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
पूर प्रभावित भागात बांधकाम जोरात
गडचिरोली शहराजवळून कठाणी नदी वाहते. या नदीचा पूर दरवर्षीच गडचिरोली शहराजवळ येतो. त्यामुळे या भागाला ‘फ्लडझोन’ म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या भागात घरांचे बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही काही बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांची दिशाभूल करीत या परिसरातील जागा विकल्या आहेत. विशेष म्हणजे, नवीन शहर विकास आराखड्यातही या भागाला ‘फ्लड झोन’ म्हणूनच घोषीत केले आहे.
जुन्याच आराखड्यानुसार सध्या विस्तार
१९९१ साली तयार करण्यात आलेल्या आराखड्याची मुदत २०११ सालीच संपली. नगर रचना विभागाने तत्पुर्वीच पूर्व तयार करून २०१२ साली नवीन आराखडा तयार करणे आवश्यक होते. मात्र सदर आराखडा तयार करण्यात आला नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून जुन्याच आराखड्याप्रमाणे शहरात विकासकामे केली जात आहेत. हे बांधकाम भविष्यात धोक्याचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.