मतमोजणीची तयारी पूर्ण
By Admin | Updated: October 18, 2014 01:28 IST2014-10-18T01:28:09+5:302014-10-18T01:28:09+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली असून..

मतमोजणीची तयारी पूर्ण
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली असून १९ आॅक्टोबरला सकाळी ८ वाजतापासून देसाईगंज, गडचिरोली व आलापल्ली स्थित नागेपल्ली येथे शासकीय मतमोजणी केंद्रावर मतमोजणी होणार आहे. या सर्व मतमोजणी केंद्रावरची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे मतमोजणीच्या दिवशीही प्रचंड सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.
६८ गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मतमोजणीची व्यवस्था गडचिरोली येथील चंद्रपूर मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात करण्यात आली आहे. या मतमोजणीसाठी जवळपास ४० कर्मचारी लागणार असून मतमोजणीसंदर्भातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मतमोजणीस्थळी १४ टेबल राहणार असून पोस्टल मतमोजणीसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतमोजणीदरम्यान साधारणत: १३ फेरी होतील, अशी माहिती प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे. सकाळी ८ वाजतापासून त मतमोजणी संपेपर्यंत साधारणत: २ ते ३ वाजेपर्यंत निकाल येईल, अशी अपेक्षा आहे. राजकीय पक्षाचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता मतमोजणीस्थळी बोलाविण्यात आले आहे. या ठिकाणी फेरीनिहाय मतमोजणीची माहिती नागरिकांना देण्यासाठी ध्वनीक्षेपकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पत्रकारांसाठी स्वतंत्र मीडिया कक्ष निर्माण केले जाणार आहे.
६९ अहेरी विधानसभा क्षेत्राची मतमोजणी नागेपल्लीस्थित आलापल्ली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात होणार आहे. १४ टेबलवर २० फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी केली जाणार असून प्रत्येक टेबलसाठी दोन महत्वाचे कर्मचारी, अधिकारी असे २८ जण नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय ५० कर्मचारी या मतमोजणी कामात सहभागी असतील. अहेरी उपविभागातील ५ तालुक्याचे तहसीलदार व नायब तहसीलदार मतमोजणीच्या कामावर देखरेख ठेवणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल घोषित होईल, अशी अपेक्षा आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या परिसरात देसाईगंज येथे राहणार आहे. या कामासाठी १४ पर्यवेक्षक, १४ सहाय्यक, ४ राखीव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. स्ट्राँगरूमची सुरक्षा व्यवस्था गडचिरोली पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दल हे पाहत आहेत. एका राऊंडला किमान पाऊन ते एक तासाचा कालावधी लागेल, अशी अपेक्षा आहे.