गर्भवती मुलीच्या वडिलाला शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 01:10 IST2017-04-26T01:10:28+5:302017-04-26T01:10:28+5:30
प्रसूतीसाठी मुलीला दवाखान्यात भरती करण्यासाठी रूग्णवाहिका मागण्याच्या उद्देशाने गेलेल्या गरोदर महिलेच्या

गर्भवती मुलीच्या वडिलाला शिवीगाळ
सीईओंकडे तक्रार : वैरागड पीएचसीतील वाहनचालकाकडून घडला प्रकार
वैरागड : प्रसूतीसाठी मुलीला दवाखान्यात भरती करण्यासाठी रूग्णवाहिका मागण्याच्या उद्देशाने गेलेल्या गरोदर महिलेच्या वडिलाला वाहनचालकाने अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. संबंधित वाहनचालकावर कारवाई करावी, अन्यथा दवाखान्याला कुलूप ठोकण्याचा इशारा वैरागड येथील नागरिकांनी दिला आहे.
रोशनी मुकेश श्रीरामवार ही बाळंतपणासाठी तिचे वडील अनिल आयलवार यांच्याकडे वैरागड येथे माहेरी आली होती. २४ मार्चला प्रसूती वेदना सुरू झाल्याने आयलवार यांनी वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तेथील वैैद्यकीय अधिकारी डॉ. विलास वाघमारे यांच्याकडे रूग्णवाहिकेची मागणी केली. डॉ. वाघमारे यांनी दवाखान्याच्या रूग्णवाहिकेचे चालक निवासस्थानी राहतात. त्यांना बोलावून आणा व वाहन घेऊन जा, असे सांगितले. त्याप्रमाणे आयलवार हे रूग्णवाहिकेचे चालक दशरथ कोवे यांना बोलाविण्यास गेले असता, त्यांच्या पत्नीने दशरथ कोवे यांची प्रकृती बरी नाही, असे सांगितले. पण मुलगी अस्वस्थ असल्याने आयलवार यांनी वाहन आणण्याचा आग्रह कोवे यांच्याकडे केला असता, कोवे यांनी आयलवार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. वाहन चालकाच्या या असभ्य वर्तणुकीमुळे आयलवार यांनी आपल्या गरोदर मुलीला खासगी वाहनातून दवाखान्यात नेले व सुरळीत प्रसूती झाली. गरोदर मातेसाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास कोवे यांनी टाळाटाळ केली आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली आहे. कोवे यांची चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अन्यथा रूग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)