जनतेच्या कामांना प्राधान्य द्या
By Admin | Updated: May 11, 2015 01:27 IST2015-05-11T01:27:22+5:302015-05-11T01:27:22+5:30
शहरातील विविध समस्यांची भरमार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करण्याची वेळ येऊ नये याकरिता कर्मचाऱ्यांनी जनतेच्या विविध समस्या लक्षात घेऊन ..

जनतेच्या कामांना प्राधान्य द्या
आरमोरी : शहरातील विविध समस्यांची भरमार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करण्याची वेळ येऊ नये याकरिता कर्मचाऱ्यांनी जनतेच्या विविध समस्या लक्षात घेऊन त्या त्वरित निकाली काढण्याकरिता प्राधान्य द्यावे, असे निर्देश तहसीलदार तथा नगर पंचायतीचे प्रशासक दिलीप फुलसुंगे यांनी दिले.
नगर पंचायतीच्या निर्मितीनंतर पार पडलेल्या पहिल्या बैठकीला ग्रामसेवक एन. ए. डाखरे, वरिष्ठ लिपिक तोरणकर उपस्थित होते. बैठकीत शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान शहरातील अंतर्गत रस्ते, साफसफाई, व अन्य समस्यांवर चर्चा करण्यात आली. सभेला कर्मचारी, सफाई कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातही यापुढे वाढ होणार आहे. परिणामी नगर पंचायतीच्या कामांचा विस्तार वाढणार आहे. नगर पंचायत झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा येथील जनता बाळगूण आहे. ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांनीही काम करावे.
पुढील महिन्यापासून पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नालीची चांगल्या पध्दतीने साफसफाई होईल, याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष घालावे. रस्त्याच्या बाजुला पडलेला कचरा उचलण्याला विशेष प्राधान्य द्यावे, अन्यथा याच कचऱ्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात रोग पसरण्याची शक्यता आहे. प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर घंटागाडी उभी ठेवून कचरा गोळा केल्यास शहरात कचरा निर्माण होणार नाही. कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांचे काम शक्यतो लवकर करावे, हे करीत असताना नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश नगर पंचायतीचे प्रशासक दिलीप फुलसुंगे यांनी दिले. (प्रतिनिधी)