पीपीई किट फेकली रस्त्याच्या कडेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST2020-09-14T05:00:00+5:302020-09-14T05:00:13+5:30
देसाईगंज ते आरमोरी या मुख्य मार्गावर, आरमोरीच्या दिशेने जाताना कोंढाळा गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूला ती पीपीई किट रविवारी (दि.१३) दुपारी पडलेली होती. रस्त्याने जाणारे लोक त्याकडे पाहात होते पण कोणीच त्याबाबतची माहिती प्रशासनाला दिली नाही. सदर प्रतिनिधीने याबाबत प्रभारी तहसीलदार दीपक गुट्टे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर देत त्या किटची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतला सूचना दिली जाईल असे उत्तर दिले.

पीपीई किट फेकली रस्त्याच्या कडेला
नितेश पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुड : गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढून मृत्यूही ओढवणे सुरू झाले असताना दुसरीकडे पीपीई किटची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता ती बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून देण्याचा प्रकार 'लोकमत'च्या निदर्शनास आला. त्या बेजबाबदार व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आव्हान आता आरोग्य आणि पोलीस विभागापुढे निर्माण झाले आहे.
देसाईगंज ते आरमोरी या मुख्य मार्गावर, आरमोरीच्या दिशेने जाताना कोंढाळा गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूला ती पीपीई किट रविवारी (दि.१३) दुपारी पडलेली होती. रस्त्याने जाणारे लोक त्याकडे पाहात होते पण कोणीच त्याबाबतची माहिती प्रशासनाला दिली नाही. सदर प्रतिनिधीने याबाबत प्रभारी तहसीलदार दीपक गुट्टे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर देत त्या किटची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतला सूचना दिली जाईल असे उत्तर दिले.
ती पीपीई किट कोरोना विषाणूयुक्त असण्याची शक्यता असल्याने त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासोबतच या बेजबाबदारपणासाठी संबंधितावर योग्य ती कारवाई होण्याची गरज असल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर त्यांनी योग्य ती कारवाई केली जाईल, आणि आरोग्य विभागालाही कळवणार असल्याचे सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना कोरोनाच्या विषाणूंची बाधा होऊ नये म्हणून डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना ही पीपीई किट दिली जाते. त्यामुळे त्या पीपीई किटवर कोरोनाचे विषाणू असण्याची दाट शक्यता असते. अशावेळी त्या किटची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असताना ती किट रस्त्यालगत फेकलीच कशी, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयासह आरमोरी आणि देसाईगंज येथे असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये अशा किटचा वापर केला जातो. त्यामुळे ही किट तेथून आली की कोणत्या खासगी रूग्णालयाने त्या कीटचा वापर करून ती अशी बेवारसपणे फेकली, याचा शोध लावणे गरजेचे आहे. देसाईगंज तालुका प्रशासन मात्र त्याबाबत फारसे उत्सुक नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग सुरू झाला असताना ही प्रशासकीय उदासिनता चिंताजनक ठरत आहे.
संध्याकाळपर्यंत किट तिथेच पडून
सदर बेवारस पीपीई किटसंदर्भात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिली असता, त्या कीटशी आपला संबंध नसल्याचे सांगत त्यांनी ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षकांना कळविण्याचे सूचविले. अधीक्षकांना फोन केला असता त्यांनी कामात असल्याचे सांगत फोन कट केला. नंतर तहसीलदारांना माहिती देण्यात आली. परंतु संध्याकाळपर्यंत किट त्याच ठिकाणी पडून होती.