कोटगल येथील वीज पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:15 IST2018-08-06T23:14:51+5:302018-08-06T23:15:11+5:30
कोटगल येथील २२० केव्ही ईएचव्ही उपकेंद्रातील एका पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, धानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात नाईलाजाने सक्तीचे भारनियमन करावे लागत आहे.

कोटगल येथील वीज पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोटगल येथील २२० केव्ही ईएचव्ही उपकेंद्रातील एका पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, धानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात नाईलाजाने सक्तीचे भारनियमन करावे लागत आहे.
कोटगल वीज उपकेंद्रातून गडचिरोली, आरमोरी, धानोरा उपविभागाला विजेचा पुरवठा केला जातो. या ठिकाणी २५ एमव्हीएचे दोन पॉवर ट्रान्सफार्मर बसविले आहेत. २८ जुलै रोजी क्रमांक २ च्या पॉवर ट्रान्सफार्मरच्या केबलमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे संपूर्ण वीज भार ट्रान्सफार्मर क्रमांक १ वर टाकण्यात आला आहे. एकाच ट्रान्सफार्मरवरून वीज पुरवठा होत असल्याने कधीकधी या ट्रान्सफार्मरवरील लोड वाढते. त्यामुळे आरमोरी, धानोरा, कुरखेडा, गडचिरोली तालुक्यातील ग्रामीण भागात सक्तीचे भारनियमन करावे लागत आहे. पावसाने उसंत घेतल्याने गरमीत वाढ झाली आहे. अशातच भारनियमन केले जात असल्याने नागरिकांना मनस्ताप होणे सहाजिक आहे. मात्र भारनियमन केल्याशिवाय वीज कंपनीलाही दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बिघाड निर्माण झाला तेव्हापासूनच बिघाड दुरूस्त करण्याच्या कामाला लागले आहेत. मात्र बिघाड मोठा असल्याने आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत भारनियमन करावेच लागणार आहे. भारनियमन करण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांचा काहीच दोष नाही. गडचिरोली येथूनच भारनियमन केले जात आहे. बिघाड दुरूस्त होताच वीज पुरवठा नियमित होईल. ग्राहकांनी महावितरणची अडचण लक्षात घेऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी केले आहे.