चपराळा मार्ग डांबर उखडल्याने खड्ड्यात
By Admin | Updated: February 7, 2015 00:47 IST2015-02-07T00:47:58+5:302015-02-07T00:47:58+5:30
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वपूर्ण चपराळा देवस्थानकडे जाणाऱ्या आष्टी-चपराळा डांबरीकरण मार्गावर ...

चपराळा मार्ग डांबर उखडल्याने खड्ड्यात
आष्टी : जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वपूर्ण चपराळा देवस्थानकडे जाणाऱ्या आष्टी-चपराळा डांबरीकरण मार्गावर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. याशिवाय या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण वाढले असून काटेरी झाडेझुडपे वाढल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
मार्र्कंडा देवस्थानाला विदर्भाची काशी म्हणून ओळखले जात असून गडचिरोली जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे हे देवस्थान आहे. जिल्ह्यासह विदर्भातील हजारो भाविक मार्र्कंडा तिर्थस्थळी येतात. तेथून अनेक भाविक चपराळा देवस्थानकाडे येतात. त्यामुळे आष्टी-चपराळा मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या भाविकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या परिसरातील नागरिकांनी रस्ता दुरूस्तीची मागणी सातत्याने प्रशासनाकडे लावून धरली. मात्र आष्टी-चपराळा मार्ग दुरूस्ती करण्याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सदर मार्ग अरूंद असल्यामुळे मोठी चारचाकी वाहने जाण्यासाठी अडचण निर्माण होते. याशिवाय रस्त्याच्या कडेला गावातील नागरिकांनी शेणखत व घराचे निरूपयोगी बांधकाम साहित्य टाकून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या मार्गाची रूंदी आणखी कमी झाली आहे. रस्त्याच्या बाजुला काटेरी झुडपीही वाढली आहे. (प्रतिनिधी)