जिल्ह्यात नगर पंचायतींमध्ये पदभरती होणार

By Admin | Updated: July 7, 2016 01:28 IST2016-07-07T01:28:19+5:302016-07-07T01:28:19+5:30

गडचिरोली जिल्ह्यात १ मे २०१५ ला १० नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यानंतर या ठिकाणी निवडणुका होऊन नगराध्यक्ष व नगरसेवक कार्यान्वित झाले.

Posting of Nagar Panchayats in the district will be done | जिल्ह्यात नगर पंचायतींमध्ये पदभरती होणार

जिल्ह्यात नगर पंचायतींमध्ये पदभरती होणार

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याचा परिणाम : आता १० नगर पंचायतीत नवे कर्मचारी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात १ मे २०१५ ला १० नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यानंतर या ठिकाणी निवडणुका होऊन नगराध्यक्ष व नगरसेवक कार्यान्वित झाले. मात्र नवीन निर्माण झालेल्या नगर पंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाजाला गती देता आलेली नव्हती. यादृष्टीने गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न वारंवार लावून धरला होता. राज्य सरकारने राज्यातील १०१ नगर परिषद व नगर पंचायतीमध्ये पदभरतीसाठी मान्यता प्रदान केली आहे.
१४ जून २०१६ ला राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन नगर पंचायतींमध्ये नवीन पदभरतीला मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. ५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ८ नगर पंचायतीत १८ पदे, ५ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या ३० नगर पंचायतीत २० पदे, १० ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या ५६ नगर पंचायतीत २९ पदे व २५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७ नगर परिषदांमध्ये ३९ पदे भरण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या नव्या नगर पंचायती निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी कायम मुख्याधिकारी नाहीत. याशिवाय कर्मचारीही नसल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. अहेरी येथील नगरसेवकांनी नगर पालिकेत पदभरती करावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत ना. अम्ब्रीशराव आत्राम यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे या प्रश्नावर पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी पदभरतीचा हा निर्णय लागू केला आहे. याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील १० नगर पंचायतीनांही होणार आहे.
चामोर्शी, अहेरी, कुरखेडा या तीन मोठ्या लोकसंख्येच्या नगर पंचायत असून कोरची, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, धानोरा या मध्यम पाच ते सात हजार लोकसंख्येच्या नगर पंचायती आहेत. त्यामध्ये आता विविध पदांची भरती होईल. या सर्व पदांच्या निर्मितीनंतर यांच्या वेतनश्रेण्याही राज्य सरकारने निश्चित केल्या असून सदर पदभरतीसाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

या पदांची होणार भरती
१० नगर पंचायतीमध्ये लिपीक टंकलेखक ५ पदे, स्वच्छता निरिक्षक, गाळणी चालक/प्रयोगशाळा सहायक, पंप आॅपरेटर, विजतंत्री, जोडारी, तारतंत्री, वायरमन, शिपाई, मुकादम, व्हॉल्वमन प्रत्येक १ याप्रमाणे एकूण १३ पदे तसेच राज्यस्तरीय संवर्गातील सहायक कार्यालय अधीक्षक, कर निरीक्षक, लेखापाल, लेखा परीक्षक, स्थापत्य अभियंता (अ वर्ग), पाणी पुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (वर्ग १) व नगररचनाकार सार्वजनिक बांधकाम (वर्ग १) आदी ७ पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामधून एका नगर पंचायतीत २० पदे भरले जाणार आहेत. राज्य सरकारने सध्या नायब तहसीलदारांना प्रशासक म्हणून नगर पंचायतीमध्ये बसविले आहे. त्यानंतर आता राज्य सरकार या नगर पालिकांसाठी नवे मुख्याधिकारीही देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Posting of Nagar Panchayats in the district will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.