काँग्रेसमध्ये गटनेते पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 01:23 IST2017-02-27T01:23:36+5:302017-02-27T01:23:36+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची वाताहत होत असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र भाजपच्या लाटेतही काँग्रेस स्थिर राहिली आहे.

काँग्रेसमध्ये गटनेते पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू
गडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची वाताहत होत असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र भाजपच्या लाटेतही काँग्रेस स्थिर राहिली आहे. २०१२ पेक्षा एक जागा अधिक जिंकत काँग्रेसने गडचिरोलीचा गड कायम राखला आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे १५ सदस्य निवडून आले आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे सहा जि.प. सदस्य गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून सात सदस्य निवडून आले. तर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे या १५ सदस्यातून गटनेता निवडीसाठी चुरस आहे. आमदार वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक अॅड. राम मेश्राम जेप्रा-विहिरगाव मतदार संघातून निवडून आले आहे. ते गटनेते पदाच्या शर्यतीत आहे. तर जि.प.तील अनुभवाच्या आधारावर धानोरा तालुक्यातून निवडून आलेले मनोहर पाटील पोरेटी हे गटनेते पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. मनोहर पोरेटी यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मृदूभाषी असलेले मनोहर पोरेटी यांनी धानोराचा गड कायम राखण्यात यश मिळविले. काँग्रेसचे १५ सदस्य पक्षांतर्गत तीन गटात विभागलेले असल्याने आनंदराव गेडाम गटाच्या सदस्यांचे समर्थन गटनेता निवडीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पोरेटींचे पारडे जड आहे. सोमवारी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार गडचिरोलीत होणार आहे. त्यानंतरच गटनेते पदासाठी निवड केली जाईल. काँग्रेस सत्तेसाठीही मोर्चेबांधणी करणार असल्याची चर्चा आहे.