भाजप-राकाँच्या मनोमिलनाची शक्यता
By Admin | Updated: February 25, 2017 01:15 IST2017-02-25T01:15:41+5:302017-02-25T01:15:41+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल त्रिशंकू आला आहे; मात्र भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक २० जागा

भाजप-राकाँच्या मनोमिलनाची शक्यता
जुने मित्र पुन्हा एकत्र येणार : जि.प.मध्ये बहुमताचा २६ जादुई आकडा पार करण्यासाठी
गडचिरोली : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल त्रिशंकू आला आहे; मात्र भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक २० जागा मिळाल्या असल्याने भाजपचा अध्यक्ष विराजमान होणार हे निश्चित आहे. भारतीय जनता पक्ष बहुमताचा २६ आकडा पूर्ण करण्यासाठी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मदत घेण्याची दाट शक्यता आहे. यादृष्टीने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून चाचपणीला सुरूवात झाली आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपला २०, काँग्रेसला १५, राष्ट्रवादी काँग्रेसला पाच, आदिवासी विद्यार्थी संघाला सात, रासपला दोन व अपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नऊ जागा होत्या. काँग्रेसला १४, भाजपला आठ, शिवसेनेला दोन, युवाशक्ती आघाडीला सहा, भाकपला एक, आविसला तीन, नाविसला चार जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र त्यावेळी काँग्रेस, राकाँ आघाडी केवळ अध्यक्ष पद काँग्रेसला हवे म्हणून होऊ शकली नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना नऊ सदस्यांच्या बळावर भाजपच्या मदतीने अध्यक्षपदी विराजमान केले होते. त्यानंतर अडीच वर्ष आर. आर. पाटील पालकमंत्री असतानाही भाजप, राष्ट्रवादीची अभेद युती इतरांच्या मदतीने जिल्हा परिषदेत कायम राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस हा गडचिरोली जिल्ह्यात कुणाचाही मित्र होऊ शकतो. सत्तेच्या वलयाजवळ राहण्याची राष्ट्रवादीच्या राज्य नेतृत्वाची भूमिका जिल्ह्यात रूजविण्याचे काम धर्मरावबाबा आत्राम यांनी कायम स्वीकारलेली आहे. त्यामुळे त्यांनी सर्व पक्ष आपले मित्र असा कायम नारा ठेवला आहे. त्यामुळे भाजपचे २०, राष्ट्रवादीचे पाच व आणखी एक ते दोन सदस्यांचा पाठींबा मिळवित भारतीय जनता पक्ष जि.प.च्या सत्तेचा मार्ग सूकर करण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाकडून समविचारी पक्षांना सोबत घेऊन जि.प.ची सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे मतप्रदर्शन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसने सोबत घेतले तरी २० पर्यंतच संख्याबळ पोहोचू शकते. धर्मरावबाबा आत्राम व आविसचे नेते माजी आमदार दीपक आत्राम एकत्र येऊ शकतील काय हा प्रश्न अजुनही कायमच आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात दीपक आत्राम यांची आविसं ही राष्ट्रवादी काँग्रेसची क्रमांक एकची जि.प. निकालानंतर शत्रू आहे. त्यामुळेच राकाँ, आविसं, काँग्रेस एकत्रित येण्याची शक्यता फार कमी आहे. शिवाय काँग्रेसकडे १५ सदस्य असल्यामुळे अध्यक्ष पदाचा दावा सोडणार नाही. काँग्रेसकडे रूपाली पंदीलवार या अध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार आहेत. त्या आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. तर अॅड. राम मेश्राम हे समाज कल्याण सभापती पदाचे प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेसच्या १५ सदस्यांची विभागणी लक्षात घेतली तर आमदार वडेट्टीवार व आनंदराव गेडाम यांच्या बाजुने अधिक सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसला सत्तेची मोट बांधणे पक्षाअंतर्गत अडचणीचेच ठरणारे आहे. त्यामुळे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस या परंपरागत मित्राला जवळ करीत जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्याची दाट शक्यता आहे. भाजपला चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे येथूनच भारतीय जनता पक्ष अध्यक्ष पदाचा बहुजन चेहरा निवडण्याची शक्यता आहे.