शिक्षणामध्ये सकारात्मक बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2016 01:47 IST2016-01-23T01:47:00+5:302016-01-23T01:47:00+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शाळा दत्तक घेण्याच्या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे.

शिक्षणामध्ये सकारात्मक बदल
अधिकाऱ्यांनी वेळ द्यावा : शिक्षण आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती
गडचिरोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शाळा दत्तक घेण्याच्या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे. हा परिणाम कायम ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनीही शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन उपक्रमांची पाहणी करावी, चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
शिक्षण हक्क कायदा पास झाल्यानंतर शिक्षणाचा दर्जा काही प्रमाणात उंचावला आहे. मात्र दुर्गम व ग्रामीण भागातील शाळांमध्ये अजूनही समस्याच दिसून येत होत्या. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा कमी पडली असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य शासनाने २२ जूनपासून संपूर्ण राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम सुरू केला आहे. दर्जेदार शिक्षणाची हमी या उपक्रमांतर्गत देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गतच आपण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील सर्वच शाळा दत्तक घेतल्या. तीन महिन्यांपूर्वी या तालुक्यातील काही मोजक्या शाळांना आपण भेटी दिल्या होत्या. त्यावेळी तेथील शिक्षणाचा खालावलेला दर्जा लक्षात आला. त्यानंतर या शाळा दत्तक घेण्याचा निर्णय आपण घेतला. राज्याचा शिक्षण आयुक्त असल्याने संपूर्ण राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारणा हे आपल्यावरची जबाबदारी आहे. तरीही ज्या शाळा दत्तक घेण्यात आल्या आहेत, त्या शाळांवर आपली विशेष नजर राहणार आहे. शाळा दत्तक घेण्याला जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत भामरागड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये सकारात्मक बदल आपल्याला दिसून आला आहे.
तीन महिन्यांपूर्वीच्या भेटीमध्ये ताडगाव केंद्र शाळेच्या परिसरात गवत उगवले होते. सभोवताल घाण पसरली होती. शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झाला होता. बुधवारी या शाळेला भेट दिली असता, सदर शाळेला चांगली रंगरंगोटी करण्यात आली होती. शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्यामध्येही चांगला संवाद दिसून आला. विद्यार्थ्यांचेही पटसंख्या वाढली. या शाळेसोबतच इतरही शाळांमध्ये चांगले बदल दिसून येत आहेत. बहुतांश शाळांमधून ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. ज्या शाळेकडे निधी नाही, अशा शाळांचे शिक्षक लोकवर्गणीतून शाळेला रंगरंगोटी करीत आहेत. कस्तुरबा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींमध्येही उत्साह दिसून आला. दहावीच्या १०० टक्के निकालाची हमी कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या शिक्षकांनी दिली आहे.
सकारात्मक बदल कायम ठेवण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी यांनी या बाबीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तशा प्रकारच्या सूचना अधिकारी वर्गाला देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनीही स्वस्त न बसता शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन करावे, असे आवाहन डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केले.
पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी रणजीतकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, डायटचे प्राचार्य बी. जी. चौरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम, प्रा. डॉ. विनीत मत्ते, रवींद्र रमतकर, प्रभारी उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, साधन व्यक्ती वकील खेडेकर आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
दर्जेदार शिक्षणाची हमी
शिक्षण कायद्याने शिक्षणाची हमी दिली आहे. तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राने शिक्षणाच्या हमीबरोबरच दर्जेदार शिक्षणाचीही हमी दिली आहे. जो विद्यार्थी येत नाही, त्याचा शोध घेऊन शाळेत टाकले जात आहे. मात्र शिक्षक एवढ्यावरच थांबला नसून आलेला विद्यार्थी शाळेत टिकला पाहिजे, त्याला शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये प्रेमपूर्वक संबंध निर्माण झाले पाहिजे, त्या विद्यार्थ्याच्या किमान क्षमता विकसित झाल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले जात आहे. पोषण आहाराचा दर्जा सुधारण्याचासुद्धा प्रयत्न केला जात आहे.