पोर्लात दुरूस्ती कामात घोळ
By Admin | Updated: June 7, 2015 02:04 IST2015-06-07T02:04:31+5:302015-06-07T02:04:31+5:30
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने गडचिरोली उपविभागांतर्गत पोर्ला येथे २९ लाख रूपयांच्या नळ योजनेची दुरूस्ती ...

पोर्लात दुरूस्ती कामात घोळ
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने गडचिरोली उपविभागांतर्गत पोर्ला येथे २९ लाख रूपयांच्या नळ योजनेची दुरूस्ती व वाढीव पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले. या कामावर आतापर्यंत १९ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. मात्र वाढीव पाईपलाईनचे काम अर्धवट असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. या नळ योजना दुरूस्तीच्या कामात मोठा आर्थिक घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने येथील जिल्हा परिषद सदस्याविषयी जनमानसामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हे सदस्य समाज कल्याण समितीचे सभापती असूनही ग्रामपंचायतीच्या गोदामातून पाणी पुरवठा योजनेचे पाईप त्यांनी ग्रा.पं. निवडणुकीत गटाचा पराभव झाल्याच्या दिवशीच आपल्या एका समर्थकाच्या घरी नेऊन ठेवले आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीचे हे पाईप बेकायदेशीरपणे उचल करण्यात आल्याने या गंभीर प्रकरणाची तक्रार वरिष्ठस्तरावर करण्यात आली आहे.
जि. प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पोर्ला येथे २९ लाख रूपयांचे नळ पाणीपुरवठा योजना दुरूस्ती व वाढीव पाईपलाईनचे काम २०१३ च्या आॅक्टोबर महिन्यात मंजूर करण्यात आले. गडचिरोली उपविभागामार्फत या कामाचे आदेश कंत्राटदार अशोक रागीवार यांना फेब्रुवारी २०१४ मध्ये देण्यात आले. मंजुर करण्यात आलेल्या अंदाज पत्रकानुसार २९ लाख रूपयांच्या निधीतून नदीपात्रात छोटी विहीर बांधणे, सछीद्र पाईपनलीका स्वच्छ करणे, दोन्ही विहिरीतील गाळ उपसणे, उर्ध्व नलीकेचे १ हजार २०० मिटर पाईपलाईन टाकणे व पाणी वितरण व्यवस्थेसाठी ३०० मिटरची वाढीव पाईपलाईन टाकणे आदी कामांचा समावेश आहे. यामध्ये आतापर्यंत नदीपात्रातील जुन्या विहिरीची उंची जवळपास १२ फुट वाढविण्यात आली. सछीद्र पाईपनलीका स्वच्छ करण्यात आली. तसेच दोन्ही विहिरींतील गाळ उपसण्यात आला. उर्ध्व नलीकेची जवळपास १ हजार मिटर पाईपलाईन टाकण्यात आली. या कामावर १९ लाख रूपयांचा खर्च झाला असून संबंधित कंत्राटदाराला उपविभाग प्रशासनाने १९ लाखांचे बिल अदा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
उर्ध्व नलीकेचे जवळपास २०० मिटर व ३०० मिटर वाढीव पाईपलाईन टाकण्याचे काम शिल्लक आहे. कामाचे आदेश दिल्यापासून सदर नळ योजना दुरूस्तीचे काम पूर्ण करण्याचा कालावधी एक वर्षाचा होता. एक वर्ष तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊनही या नळ योजनेच्या दुरूस्तीचे काम अर्धवट आहे. मात्र या संदर्भात गडचिरोली उपविभागाच्या शाखा अभियंत्यांनी संबंधित कंत्राटदाराला अद्यापही काम अपूर्ण असल्याबाबतची नोटीस बजावली नाही. त्यामुळे पोर्लाच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामातील गैरव्यवहार व दिरंगाईपणात शाखा अभियंताही जबाबदार असल्याचे दिसून येते.
पोर्लाच्या नळ पाणीपुरवठा योजना दुरूस्तीच्या कामात दोन्ही विहिरींतील गाळ उपसण्यात आला आहे. उर्ध्व नलीकेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम काही प्रमाणात झाले आहे. वाढीव पाईपलाईन टाकण्याचे काम बाकी आहे. एक वर्षाच्या मुदतीत संबंधित कंत्राटदाराकडून सदर काम पूर्ण करण्यात आले नाही. मात्र याबाबत उपविभागाच्या वतीने संबंधित कंंत्राटदाराला कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली नाही. पदाधिकारी व कंत्राटदार यांच्यातील अंतर्गत वादामुळे पाईपलाईन टाकण्याचे काम थांबले आहे.
- जी. डी. बारापात्रे, शाखा अभियंता, जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, गडचिरोली
पोर्ला येथे अत्यंत कमी प्रमाणात व थातूरमातूर स्वरूपाचा नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरूस्तीचे काम झाले आहे. वाढीव पाईपलाईन टाकण्याचे काम बंद आहे. या कामावर आतापर्यंत १९ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र तेवढ्याप्रमाणात काम झालेले दिसत नाही. या कामात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी.
- विश्वनाथ म्हशाखेत्री, सामाजिक कार्यकर्ते, पोर्ला
शासकीय नियमानुसार व कामाच्या अंदाज पत्रकानुसार तीन मिटर खोल पाईपलाईन टाकणे आवश्यक आहे. मात्र या कामात संबंधित कंत्राटदाराने दोन मिटर खोल पर्यंत पाईपलाईन टाकली. परिणामी अनेकदा पाईपलाईन लिकेज झाली. ग्रा. पं. च्या वतीने काही दिवसांपूर्वी त्यावर माती टाकून उंच करण्यात आले.
- नरेंद्र मामीडवार, उपसरपंच, ग्रा. पं. पोर्ला
निकृष्ट बांधकाम होत असल्याची होती जि.प. सभापतींची तक्रार
पोर्ला येथील नळ पाणीपुरवठा योजना दुरूस्ती व पाईपलाईन टाकण्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून या कामाची चौकशी करण्याची तक्रार जि. प. चे समाजकल्याण सभापती विश्वास भोवते यांनी २३ एप्रिल २०१५ रोजी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीवरून गडचिरोली उपविभागाचे शाखा अभियंता जी. डी. बारापात्रे यांनी २७ एप्रिल २०१५ रोजी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. या नळ योजना दुरूस्तीचे काम व्यवस्थित असल्याचे त्यांना आढळून आले. याशिवाय काम योग्य असल्याचे लेखी हमीपत्र पोर्ला ग्रा. पं. चे ग्राम विकास अधिकारी मून व तत्कालीन सरपंच यांनी दिले आहे. असे असतानाही जि.प. सभापतींनी केवळ कंत्राटदारावर केवळ दबावतंत्र निर्माण करण्यासाठी तक्रार केली होती व गावातील काम रोखून धरण्याचा प्रकार केला, अशी माहिती पोर्ला येथील नागरिकांनी लोकमतशी बोलताना शनिवारी दिली.