डोंगरतमाशी कुरंडी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:41+5:302021-06-05T04:26:41+5:30

वैरागड : मानापूर मार्गावर वैरागडपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या डोंगरतमाशी घाटावरील खोब्रागडी नदीच्या पुलाच्या दुसऱ्या टोकापासून ते कुरंडीपर्यंत आणि ...

Poor road condition in the hills | डोंगरतमाशी कुरंडी रस्त्याची दुरवस्था

डोंगरतमाशी कुरंडी रस्त्याची दुरवस्था

वैरागड : मानापूर मार्गावर वैरागडपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या डोंगरतमाशी घाटावरील खोब्रागडी नदीच्या पुलाच्या दुसऱ्या टोकापासून ते कुरंडीपर्यंत आणि वडेगाव फाट्यापर्यंत हा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. या मार्गावर माेठमोठाले खड्डे पडले आहेत. डोंगरतमाशी घाटावर पुलाचे बांधकाम झाले तेव्हापासून या मार्गाची वर्दळ वाढली आहे. या मार्गाने मेंढा, वडेगाव, सलंगटोला, पिसेवडरधा गावांतील नागरिकांची रहदारी राहते. डांबरी रस्त्याचे काम चारच वर्षांपूर्वी झाले. अल्पावधीतच रस्त्याची झालेली प्रचंड दुरवस्था पाहता हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्ट हाेते.

दुर्गम भागात कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन सुरू

अहेरी : अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्यांच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कर्तव्याला दांडी मारली. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडली आहेत.

कुपोषित भागामध्ये परसबागेची गरज

गडचिरोली : जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. अनेकांच्या घरी पुरेशी जागा उपलब्ध आहे. शासनाकडून पुरेसे बियाणे प्राप्त झाल्यास परसबागा लावल्या जातील.

गतिरोधकाअभावी अपघातास आमंत्रण

गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहन हाकत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते.

मानधनाअभावी वृद्ध कलावंतांची ससेहोलपट

देसाईगंज : ग्रामीण भागात समाजप्रबोधनाचे मुख्य अंग असलेल्या नाटकातील नाट्य कलावंत आजही उपेक्षितच आहेत. कित्येक कलावंतांपुढे वृद्धापकाळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे. शासनाचे मात्र या झाडीपट्टीतील कलावंतांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.

तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा

काेरची : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयामार्फत सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.

शहरातील डुकरांचा बंदोबस्त करा

कुरखेडा : शहरात डुकरांचा हैदोस वाढला आहे. नगरपंचायतीचे या डुकरांकडे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

धोडराज-हिंदेवाडा मार्गाची दुरुस्ती करा

लाहेरी : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज ते हिंदेवाडा या मार्गाची खड्ड्यांमुळे वाताहात झाली आहे. हा मार्ग पूर्णत: उखडला असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तालुका मुख्यालयाशी जोडण्याकरिता १९९८ मध्ये या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. या रस्त्यामुळे अतिदुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्याची मोठी सोय झाली; परंतु देखभाल व दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले.

माकडांचा हैदोस; पिकांचे नुकसान

कमलापूर : जंगलात वास्तव्याला राहणाऱ्या माकडांनी मागील चार ते पाच वर्षांपासून लोकवस्तीकडे धाव घेणे सुरू केल्याने ग्रामीण भागातील कौलारू छपरांच्या जुन्या घरांचे आयुष्य कमी झाले आहे. माकडांच्या हैदोसामुळे गावखेड्यातील परसबागा ओस पडत आहेत. मात्र, याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वन्यजीव प्रगणनेत माकडांचा समावेश असल्याने माकडांना इजा होईल, अशी कृती करणे हा गुन्हा ठरत असतो. काळ्या तोंडाची माकडे ही अत्यंत चपळ वन्यजीव असल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सुरसुंडीजवळील ठेंगणा पूल अडवितो मार्ग

कुरखेडा : कुरखेडा- मुरूमगाव मार्गावरील सुरसुंडी-इरुपधोडरी गावादरम्यान असलेल्या नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात हा मार्ग ठप्प होत असतो. काही नागरिक जीव मुठीत घालून पुढचा प्रवास करतात. सुरसुंडी गावाजवळून भेदरी नदी वाहते. या नदीवर ठेंगणा पूल बांधण्यात आला आहे. पावसाळ्यात थोडे अधिक पाणी पडल्यानंतर पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे वेळोवेळी वाहतूक ठप्प होत असते. कुरखेडा-मुरूमगाव मार्गावर सदर नदी आहे. पुलावरून वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर या मार्गावरची वाहतूक ठप्प होते. सुरसुंडी, इरुपधोडरीसह इतर गावे प्रभावित होतात.

सौरदिवे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

भामरागड : वीजपुरवठा नसलेल्या दुर्गम गावांमध्ये सौरदिव्यांची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली; परंतु या सौरदिव्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष आहे. काही ठिकाणच्या सौरदिव्यांच्या बॅटरीची चोरी झाली, तर काही ठिकाणी सौर प्लेट लंपास करण्यात आल्या आहेत. सौरदिवे बसविण्यासाठी शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. लखमापूर बोरी परिसरातील गावांमध्ये सौरदिवे दुर्लक्षित आहेत.

टिल्लू पंप जप्तीची मोहीम सुरू करा

आरमाेरी : उन्हाळा असल्याने पाण्यासाठी टिल्लू पंपांचा वापर वाढला आहे. नगर परिषदेतर्फे टिल्लू पंपधारकांवर कारवाई केली जात नसल्याने त्यांची हिंमत वाढत चालली आहे. त्यामुळे टिल्लू पंपाची संख्याही वाढत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेने टिल्लू पंप पकडण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी आहे. अनेक कुटुंबांकडे पाणी साठवून ठेवण्यासाठीचे साहित्य उपलब्ध नसल्याने अशा कुटुंबीयांची अल्प पाणीपुरवठ्यामुळे मोठी अडचण झाली आहे.

आमगावच्या हेमाडपंती मंदिराचा विकास करा

आमगाव (म.) : तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या आमगाव (म.) येथील हेमाडपंती मंदिर जीर्ण व दुरवस्थेत आहे. मात्र, याकडे पुरातत्व विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. येथील देवालय ऋषीची मूर्ती, शिवपिंड, नदी, अष्टविनायक, लक्ष्मी नारायण, शिवपार्वती शाईल, हत्ती, घोडे, हनुमान, महाकालीचे देवालय, खोदकामामध्ये सापडलेली नाणी, शिलालेख, टाकीच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे या मंदिराचा विकास करावा, अशी मागणी होत आहे. चामोर्शी तालुक्यात आष्टी, चपराळा भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे आहेत.

झुडपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा

गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.

घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले

गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डांत मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याची डबकी, तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या गटारांच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी, शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Poor road condition in the hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.