अत्यल्प भावाने धान उत्पादक अडचणीत
By Admin | Updated: November 20, 2015 01:45 IST2015-11-20T01:45:59+5:302015-11-20T01:45:59+5:30
जिल्ह्याचे प्रमुख पीक धान असून यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे धानाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घसरले आहे.

अत्यल्प भावाने धान उत्पादक अडचणीत
लागलेला खर्चही निघणे मुश्कील : लोकप्रतिनिधी भावाबाबत गप्पच
गडचिरोली : जिल्ह्याचे प्रमुख पीक धान असून यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे धानाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घसरले आहे. धान उत्पादक शेतकरी अत्यल्प उत्पादन व कमी भावामुळे अडचणीत आला असून यंदा शेतीला लागलेला खर्चही उत्पन्नातून वसूल होणे कठीण असल्याने शेतकरी संकटात आला आहे.
मागील १५ वर्षांपासून धानाच्या भाववाढीबाबत आंदोलन करणारे शिवसेना, भाजपचे नेते आता या मुद्यावर बोलण्यास तयार नाही. जेव्हा राज्यात आघाडी सरकार होते, त्यावेळी धानाला सहा हजार रूपये भाव द्या म्हणून मागणी करण्यासाठी मोर्चे काढण्याचे काम करण्यात येत होते. यंदा मात्र पाऊस कमी झाल्याने धानाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे. अनेक शेतांमध्ये रोगाचाही प्रादुर्भाव धानावर झाला असल्याने धान शेतकऱ्यांनी सवंगले सुध्दा नाही. काहींनी जनावर धानात सोडून दिले. दिवाळीपूर्वी जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर १४१० ते १७०० रूपये हमी भाव दिला जात आहे. तर खासगी व्यापारी १४५० ते २१०० रूपये दराने धान खरेदी करीत आहे. यामागे मोठ्या प्रमाणावर कापातही घेतली जात आहे. दररोज व्यापाऱ्यांचे भाव बदलत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात कमी जास्त भाव पडत आहे. आधीच पावसामुळे नुकसानीत आलेल्या शेतकऱ्याला अत्यल्प भावामुळे आता पुन्हा एक नवा आर्थिक फटका बसत आहे.
नव्या सरकारच्या काळात शेतकऱ्याच्या हितापेक्षा व्यापाऱ्याचे हित अधिक जपण्याची भूमिका असल्याने शेतकऱ्याची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असे चित्र संपूर्ण जिल्हाभर आहे. भाजपचा एकही लोकप्रतिनिधी धानाच्या कमी भावाबाबत बोलण्यास तयार नाही. कापूस, सोयाबिन, धान याची हमी किंमत शासनाने ठरवून दिली असली तरी त्या किमतीने शेतमालाची खरेदी होत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. हिवाळी अधिवेशनात भाव वाढ होईल काय असा सवाल आहे.(प्रतिनिधी)