दुर्गम भागात पोलिंग पार्ट्या रवाना
By Admin | Updated: April 29, 2015 01:36 IST2015-04-29T01:36:25+5:302015-04-29T01:36:25+5:30
आठ तालुक्यांमधील २३९ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक व दोन ग्राम पंचायतींमध्ये पोटनिवडणूक गुरूवारी घेतली जाणार असून यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे.

दुर्गम भागात पोलिंग पार्ट्या रवाना
गडचिरोली : आठ तालुक्यांमधील २३९ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक व दोन ग्राम पंचायतींमध्ये पोटनिवडणूक गुरूवारी घेतली जाणार असून यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. अतिसंवेदनशील भागामध्ये मोडणाऱ्या मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्तात पोलिंग पार्ट्या रवाना करण्यात येत आहेत. ७११ मतदान केंद्रावर निवडणूक घेतली जाणार आहे.
मे महिन्यात मूदत संपत असलेल्या ३३७ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश ग्राम पंचायती नक्षलग्रस्त भागात आहेत. या भागात निवडणूका घेणे पोलीस व निवडणूक प्रशासनासाठी अत्यंत आव्हानात्मक काम आहे. निवडणुका शांततेत पार पाडव्या यासाठी दोन टप्प्यात निवडणुका घेण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्याच्या निवडणुका २४ एप्रिल रोजी पार पडल्या. उर्वरित २३९ ग्राम पंचायतीच्या निवडणुका ३० एप्रिल रोजी घेतल्या जाणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या आठ तालुक्यांमधील २३९ ग्राम पंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामध्ये ७११ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये ११९ मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहेत. १९५ मतदान केंद्र संवेदनशील तर ३९७ मतदान केंद्र साधारण आहेत. आठही तालुक्यांमधून एक हजार ४९ उमेदवार रिंगणात आहेत. तर तीन लाख ३६ हजार ४८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नियोजनाचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक तहसीलदार त्यानुसार नियोजन करीत आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीप्रमाणेच यावेळी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. (नगर प्रतिनिधी)