पोलिंग पार्ट्या पायीच झाल्या रवाना
By Admin | Updated: February 21, 2017 00:41 IST2017-02-21T00:41:01+5:302017-02-21T00:41:01+5:30
अहेरी उपविभागात चार तालुक्यात २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

पोलिंग पार्ट्या पायीच झाल्या रवाना
दुर्गम भागात पोलीस संरक्षण : बेसकॅम्पवरून मतदान केंद्राकडे आगेकुच
अहेरी : अहेरी उपविभागात चार तालुक्यात २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त व दुर्गम भाग असल्याने या भागात पोलिंग पार्ट्यांना सोमवारी मतदान केंद्राच्या ठिकाणावर चोख पोलीस बंदोबस्तात पायीच नेण्यात आले.
रविवारी सकाळी भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी या चार तालुका मुख्यालयातून निवडणूक पथक पोलीस बंदोबस्तासह बेसकॅम्पवर पोहोचविण्यात आले होते. भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातही सोमवारी सकाळी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पोलिंग पार्ट्या पोहोचल्या. मात्र अहेरी, एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागात पोलीस पथकाच्या सहाय्याने अरण्य वाटेतून पायीच पार्ट्यांना पोहोचविण्यात आले. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या चार तालुक्यात मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. स्वत: जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व जिल्हाधिकारी डॉ. अभिनव देशमुख या संपूर्ण प्रक्रियेवर जातीने लक्ष देऊन आहेत. एटापल्ली येथे जाऊन त्यांनी दोन दिवसांपूर्वीच निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला होता. मंगळवारी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या भागात मतदान होणार असून या मतदानाची संपूर्ण व्यवस्था पूर्ण करण्यात आल्याचे निवडणूक विभागाने म्हटले आहे. या भागातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी दोन हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात येत आहे. मतदान पार पडल्यानंतर अत्यंत सुरक्षा व्यवस्थेत पोलिंग पार्ट्यांना बेसकॅम्पवर व तेथून तालुका मुख्यालयात पोहोचविले जाणार आहे. यासाठी विशेष सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहे.