८९ हजार बालकांना पाजणार पोलिओ डोज

By Admin | Updated: January 14, 2016 02:04 IST2016-01-14T02:04:57+5:302016-01-14T02:04:57+5:30

पोलिओ रोगाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सन १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात सुरुवात केली आहे.

Polio dosage to feed 9, 9, 000 children | ८९ हजार बालकांना पाजणार पोलिओ डोज

८९ हजार बालकांना पाजणार पोलिओ डोज

१७ ला जिल्हाभर पल्स पोलिओ मोहीम : २ हजार ३०४ केंद्र राहणार
गडचिरोली : पोलिओ रोगाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सन १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात सुरुवात केली आहे. आता गडचिरोली जिल्ह्यात १७ जानेवारी रोजी रविवारला या वर्षीच्या पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा होणार असून यादरम्यान ० ते ५ वयोगटातील एकूण ८९ हजार ५७७ बालकांना पोलिओचा डोज पाजण्यात येणार आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेसंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात मंगळवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, गृह विभागाचे नेवले आदी उपस्थित होते. १७ जानेवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेत ग्रामीण भागातील ८२ हजार १४७ व शहरी भागातील ७ हजार ४३० असे एकूण ८९ हजार ५७७ बालकांचा समावेश आहे. या बालकांना पल्स पोलिओचा डोज देण्यासाठी ग्रामीण भागात तीन दिवस तर शहरी भागात पाच दिवस घरोघरी जाऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी ग्रामीण भागात प्रत्येक गावात किमान एक याप्रमाणे २ हजार २४१ व शहरी भागात ६३ असे एकूण २ हजार ३०४ लसिकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त प्रवासात असलेल्या बालकांना तसेच स्थलांतरित होत असलेल्या व ज्या बालकांच्या निवासाची व्यवस्था नाही, अशा बालकांना पोलिओ डोज देण्यासाठी ग्रामीण भागात ९७ मोबाईल टीमची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी या बैठकीत दिली. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, डीएचओ डॉ. भंडारी यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)

मोहिमेसाठी असे आहे मनुष्यबळ
पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेअंतर्गत बुथ, ट्रांझिट टीम व मोबाईल टीमच्या वतीने बालकांना एकूण ४ हजार ७०५ लस टोचक लस देण्यात येणार आहे. या संदर्भाचे प्रशिक्षण केंद्रस्तरावर आयोजित करण्यात आले आहे. या मोहिमेकरिता ७४७ आरोग्यसेविका, ३०२ आरोग्यसेवक, २ हजार २०६ अंगणवाडी कार्यकर्ते, १ हजार ६४४ मदतनिस, १ हजार ३२ आशा वर्कर, १०९ आरोग्य सहाय्यक, ६१ आरोग्य सहाय्यिका, ८१ औषध निर्माता, ४६ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १४४ वैद्यकीय अधिकारी, ७ आरोग्य विस्तार अधिकारी, ४० प्रशिक्षार्थी एएनएम, ४८ स्टॉफ नर्स, ६७ अंगणवाडी परिवेक्षिका असे एकूण ६ हजार ५४० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ सज्ज राहणार आहे.

९५ वाहनांचा लागणार ताफा
गडचिरोली जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी एकूण ६ हजार ५४० मनुष्यबळ लागणार आहे. याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका व जिल्हा मुख्यालयस्तरावर मिळून एकूण ९५ वाहनांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत आरोग्य केंद्रस्तरावर ४५ शासकीय वाहने, मानसेवी संस्थांचे २५ असे एकूण ७० वाहने उपलब्ध आहेत. उर्वरित २५ वाहने इतर विभागाकडून अधिग्रहीत करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती डॉ. भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात एकही पोलिओ रुग्ण नाही
संपूर्ण महाराष्ट्रात सन २०१० मध्ये नाशिक जिल्ह्यात चार व बीड जिल्ह्यात एक असे एकूण पाच पोलिओ रुग्ण आढळले. २०११ ते २०१५ या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्र राज्यात एकही पोलिओ रुग्ण आढळला नाही. गडचिरोली जिल्ह्यात २०१५ मध्ये एकूण १८ संशयित पोलिओ रुग्ण शोधण्यात आले. मात्र यापैकी एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Polio dosage to feed 9, 9, 000 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.