खासदारांच्या हस्ते पोलिओ डोज
By Admin | Updated: February 23, 2015 01:25 IST2015-02-23T01:25:47+5:302015-02-23T01:25:47+5:30
राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मुलन कार्यक्रमांतर्गत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे दुसरे सत्र रविवारी राबविण्यात आले.

खासदारांच्या हस्ते पोलिओ डोज
गडचिरोली : राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मुलन कार्यक्रमांतर्गत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे दुसरे सत्र रविवारी राबविण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ० ते ५ वर्ष वयोगटातील सुमारे ८८ हजार ३०४ लाभार्थ्यांना पोलिओ लस देण्यात आली. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात खा. अशोक नेते यांच्या हस्ते तर भामरागड येथे एसडीपीओ विशाल ठाकुर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
लसीकरणासाठी शहरी, ग्रामीण क्षेत्रामध्ये ट्राझिट बुथसह असे एकुण २ हजार ३०४ केंद्र तयार करण्यात आले.
जिल्हा सामान्य रूग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एन. चौधरी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी शशीकांत शंभरकर, डॉ. भारत खटी, डॉ. इंगळे, डॉ. चांदेकर, सुरेखा सुतराळे, डॉ. मडावी उपस्थित होते.
यावेळी खासदार नेते म्हणाले की, पल्स पोलिओ मोहिमेत बालकांना पोलिओची लस पाजण्यापूर्वी लसीची तपासणी करुन ती योग्य असल्याची खात्री करुनच लस पाजावी, जेणे करुन लसीमुळे बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही. याची आरोग्य आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले.
भामरागड तालुक्यातील बालके पोलिओ डोजपासून वंचित राहू नये, यासाठी एसडीपीओ विशाल ठाकुर यांनी पुढाकार घेऊन बालकांना डोज देऊन शुभारंभ केला. यावेळी आरोग्य कर्मचारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. (शहर प्रतिनिधी)