महिला पाेलिसाने पेटवून घेत केली आत्महत्या, कोपरअल्ली येथील घटना
By गेापाल लाजुरकर | Updated: January 6, 2024 16:21 IST2024-01-06T16:20:37+5:302024-01-06T16:21:09+5:30
वैशाली आत्राम ह्या अहेरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत हाेत्या.

महिला पाेलिसाने पेटवून घेत केली आत्महत्या, कोपरअल्ली येथील घटना
गडचिराेली : तीन महिन्यांपूर्वी प्रसूती झालेल्या महिला पाेलिस शिपाईने सासरी स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली, ही घटना मुलचेरा तालुक्यातील काेपरअल्ली येथे ४ जानेवारी राेजी सायंकाळी घडली. वैशाली गुलशन आत्राम (३०) रा. काेपरअल्ली असे आत्महत्या करणाऱ्या महिला पाेलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वैशाली आत्राम ह्या अहेरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत हाेत्या. त्यांचे पतीसुद्धा अहेरी प्राणहिता पाेलिस उपमुख्यालयात कार्यरत आहेत. त्या प्रसूती रजेवर हाेत्या.
तीन महिन्यांपूर्वी वैशाली यांची प्रसूती झाली. त्यांना दुसरा मुलगा झाला. त्या सासरी काेपरअल्ली येथे कुटुंबीयांसाेबत वास्तव्यास हाेत्या. प्रसूतीनंतर त्या दडपणात हाेत्या. यातूनच त्यांची मानसिक स्थिती बिघडली व त्यांनी गुरूवारी सायंकाळी घराच्या मागच्या खोलीत जाऊन स्वत:ला पेटवून घेतले. अधिक प्रमाणात जळल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली. २०१८ मध्ये वैशाली यांचा विवाह झाला हाेता.