उपचारासाठी सरसावले पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:23 IST2018-02-16T00:23:15+5:302018-02-16T00:23:43+5:30
गेल्या ८ वर्षांपासून कुपोषणग्रस्त असलेल्या आणि आता त्वचारोगाने पीडित झालेल्या ८ वर्षीय बालिकेच्या उपाचारासाठी पोलिसांनी आर्थिक मदत देऊन आपल्यातील संवेदनशिलतेचा परिचय दिला.

उपचारासाठी सरसावले पोलीस
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : गेल्या ८ वर्षांपासून कुपोषणग्रस्त असलेल्या आणि आता त्वचारोगाने पीडित झालेल्या ८ वर्षीय बालिकेच्या उपाचारासाठी पोलिसांनी आर्थिक मदत देऊन आपल्यातील संवेदनशिलतेचा परिचय दिला.
मोनिका लालसू मडावी रा.वासेमुंडी, ता.एटापल्ली असे त्या बालिकेचे नाव आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने तिच्यावर आतापर्यंत योग्य उपचार होऊ शकले नाही. १२ फेब्रुवारीला २०१८ रोजी एटापल्ली पोलीस स्टेशनअंतर्गत वासेमुंडी गावात जनजागरण मेळावा घेण्यात आला. त्यावेळी तिच्याबद्दलची माहिती पोलिसांना समजली. एटापल्ली ठाण्याचे प्रभारी, सहायक पोलीस निरीक्षक योगेश घारे व पोलिसांनी मोनिकाच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली असता कुष्ठरोग व त्वचारोग असल्याचे तिच्या आई वडिलांनी सांगितले. त्यावेळी त्यांना थोडी आर्थिक मदत करून पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले. गुरूवारी (दि.१५) एटापल्ली ठाण्यात आल्यानंतर मोनिकाच्या उपचारासाठी तिच्या आई-वडिलांना उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस गट-८, आयआरबी गट-१६ या सर्वांकडून २१ हजार ७५० रुपयांची मदत देण्यात आल्याचे ठाणेदार घारे यांनी सांगितले.