पोलिसांमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मनस्ताप

By Admin | Updated: October 18, 2014 01:27 IST2014-10-18T01:27:00+5:302014-10-18T01:27:00+5:30

कुरखेडा, कोरची, धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातून पायपीट करीत बेसकॅम्पवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी...

Police torture election workers | पोलिसांमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मनस्ताप

पोलिसांमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मनस्ताप

देसाईगंज/मोहटोला : कुरखेडा, कोरची, धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातून पायपीट करीत बेसकॅम्पवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी देसाईगंजपर्यंत वाहनाने सोडून देण्यास नकार दिल्याने प्रचंड मनस्ताप सहन करीत तब्बल दोन दिवसानंतर देसाईगंज येथे पोहोचता आले, असा आरोप निवडणूक कर्मचाऱ्यांनी केला आहे.
निवडणूक आटोपल्यानंतर नियोजनाप्रमाणे पोलिसांनी सावरगाव मतदान केंद्र गाठले. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राधिकारी यांच्यासह चार कर्मचारी कार्यरत होते. मात्र पोलिसांनी ईव्हीएम मशीन व केवळ मतदान केंद्राधिकारी यांनाच देसाईगंज येथे पोहोचविले. इतर तीन कर्मचारी सावरगाव येथेच दोन दिवसांपासून अडकून पडले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर कर्मचाऱ्यांचा फोन आऊट आॅफ कव्हरेज दाखवत होता. तर जो मतदान केंद्राधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन आला होता, त्याच्याकडे निवडणुकीसंदर्भातील इतर कागदपत्रे व लिफाफे नसल्याने ईव्हीएम मशिनचा ताबा घेण्यास देसाईगंज येथील स्ट्राँग रूमच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे सदर अधिकारी सकाळी ११ वाजेपासून त्याच्या इतर साथीदारांची वाट बघत स्ट्राँगरूमच्या बाहेर दिवसभर ताटकळत बसला होता. सायंकाळी पोलिसांनी सावरगावचे लिफाफे देसाईगंज येथे आणले. मात्र कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता.
मालेवाडा व सुरसुंडी या बेस कॅम्पअंतर्गत असलेल्या १७ मतदान केंद्रावर ६८ कर्मचाऱ्यांनी निडणुकीची जबादारी पार पाडली. या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरून मतदान पार पाडल्यानंतर पोलीस संरक्षणात पायीच बेस कॅम्पवर आणण्यात आले. त्यानंतर १६ आॅक्टोबरच्या पहाटे मालेवाडा व सुरसुंंडी येथे हेलिकॉप्टर पाठवून या ठिकाणच्या १७ मतदान केंद्राधिकारी व ईव्हीएम मशीन आणण्यात आल्या. मतदान केंद्राधिकाऱ्यांनी निवडणुकीचे दस्ताऐवज सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यालाही विरोध केला. सदर केंद्राधिकारी देसाईगंज येथे पोहोचल्यानंतर याही कर्मचाऱ्यांना इतर दस्ताऐवज दिल्याशिवाय ईव्हीएम मशीन ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनाही ताटकळत राहावे लागले. कोटगुल, ग्यारापती बेस कॅम्पअंतर्गत येत असलेल्या निवडणुक कर्मचाऱ्यांची हिच स्थिती झाली.
बेसकॅम्पवर १५ आॅक्टोबरपासून अडकुन पडलेल्या कर्मचाऱ्यांनी देसाईगंज येथे पोहोचवून देण्यासाठी पोलिसांना विनंती केली असता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणताही आदेश नसल्याने पोहोचवून देणार नाही, असे बजाविले. त्यामुळे बेस कॅम्पवरच्या शेकडो कर्मचाऱ्यांना दोन दिवसानंतर जीव धोक्यात घालून मिळेल त्या साधनाने देसाईगंज येथे पोहोचावे लागले. पोलिसांच्या या हेकेखोरीमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला असल्याने पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
निवडणूक विभागाने बेस कॅम्प तयार केले असले तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे संपर्क केला असता, कुणीही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाही. देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी भांबावलेल्या स्थितीत होते. ते कुठलीही माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे प्रशासनाकडून या संदर्भात कुणाचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Police torture election workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.