नक्षलवाद्यांच्या पत्रकांना पोलिसांचे तगडे उत्तर

By Admin | Updated: April 24, 2015 00:00 IST2015-04-24T00:00:58+5:302015-04-24T00:00:58+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे माओवाद्यांनी विविध ठिकाणी पत्रक टाकून मतदारांना आवाहन केले होते.

Police strong response to Naxalites | नक्षलवाद्यांच्या पत्रकांना पोलिसांचे तगडे उत्तर

नक्षलवाद्यांच्या पत्रकांना पोलिसांचे तगडे उत्तर

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे माओवाद्यांनी विविध ठिकाणी पत्रक टाकून मतदारांना आवाहन केले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस प्रशासनानेही गेल्या अनेक दिवसांपासून कंबर कसली असून नक्षल्यांच्या या पत्रकबाजीला पोलीस प्रशासनाने सडेतोड उत्तर दिल्याचा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गुरूवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अहेरी उपविभागात अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या चार तालुक्यात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २४ एप्रिलला होत आहे. या निवडणुकीसाठी मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी पोलीस प्रशासनाने १५ हजार पोस्टर छापून दुर्गम गावांपर्यंत जनजागृती केली आहे. नक्षलवाद्यांनी १९८० पासून या जिल्ह्याच्या विकासात अडथळे आणलेत. सर्वसामान्यांना विकासापासून दूर ठेवण्याचे काम कशा पध्दतीने केले. रस्त्याचे काम बंद पाडून शाळा उद्ध्वस्त केल्या आदींची सचित्र माहिती जनजागृती पोस्टरमधून देण्यात आली आहे, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान वाढावे, यासाठी पोलीस प्रशासनाने ग्रामभेट कार्यक्रमावर भर देऊन नागरिकांना लोकशाहीचे महत्त्व समजावून दिले, अशी माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिले. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीला एक अतिरिक्त हेलिकॉप्टर बोलाविण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या फौजा जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
दुर्गम व अतिदुर्गम भागात पोलिसांचा जनसामान्यांशी संपर्क आता मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. नक्षल्यांचा जनाधार सातत्याने कमी होत आहे. त्यांच्या दबावामुळे नामांकनपत्र भरल्या गेले नाही, ही अत्यंत दिशाभूल करणारी बाब माध्यमांच्या माध्यमातून पसरविली जात आहे. दुर्गम भागात २० ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांकडे नामांकन पत्र भरण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रच उपलब्ध नाही. बऱ्याच ठिकाणी महिलांच्या ५० टक्के जागा आरक्षित आहे. त्या महिलांजवळ कागदपत्रांची पूर्तता नसल्याने नामांकनपत्र भरता येत नाही. ही बाब पोलीस विभागाच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. या दृष्टीने विचार होण्याची गरज आहे, असेही पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अहेरी उपविभागात ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी १९८ बूथ राहणार आहेत. त्यापैकी ३३ बूथ अतिसंवेदनशील, ९५ बूथ संवेदनशील व ७० बूथ साधारण आहेत. या सर्व ठिकाणी भरघोस मतदान मतदार करतील व लोकशाही बळकटीकरणासाठी ते सहकार्य करतील.
- संदीप पाटील,
जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली

Web Title: Police strong response to Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.