आलापल्लीत पोलिसांचा लाठीमार

By Admin | Updated: August 17, 2015 01:05 IST2015-08-17T01:05:30+5:302015-08-17T01:05:30+5:30

सर्वत्र भारतीय स्वातंत्र्याचा ६८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ध्वजारोहण आटोपून शाळेतील मुली घरी परत जात असताना ....

Police Strike in Alapoli | आलापल्लीत पोलिसांचा लाठीमार

आलापल्लीत पोलिसांचा लाठीमार

मुलींच्या टवाळकीवरून घडले प्रकरण : काही काळ तणावाची परिस्थिती
आलापल्ली : सर्वत्र भारतीय स्वातंत्र्याचा ६८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ध्वजारोहण आटोपून शाळेतील मुली घरी परत जात असताना काही टवाळखोर मुलांनी येथील मुख्य चौकात टिंगलटवाळकी केल्याच्या बाबीवरून पोलिसांनी चौकातील काही युवकांवर सौम्य स्वरूपाचा लाठीमार केल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारला ध्वजारोहण आटोपून शाळेतील काही मुली मुख्य चौकातून घरी परत जात होत्या. दरम्यान चौकात जमलेल्या काही टवाळखोर मुलांनी त्यांची टिंगलटवाळकी केली. या प्रकाराची माहिती काही लोकांनी आलापल्ली पोलीस चौकीला दिली. त्यानंतर पोलीस चौकीतील दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी जमाव होता. या जमावातील काही युवकांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याची माहिती अहेरी पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर अहेरीचे पोलीस निरिक्षक संजय मोरे हे आलापल्लीच्या मुख्य चौकात दाखल झाले. त्यांच्या समक्ष येथील काही युवकांनी गोंधळ घातला व पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे पोलीस निरिक्षक मोरे यांनी दोन युवकांना आपल्या वाहनात बसवून पोलीस ठाण्याला घेऊन गेले. त्यानंतर गावकरी व व्यापारी संतप्त गावकरी व व्यापाऱ्यांनी आलापल्लीची बाजारपेठ बंद केली. दरम्यान मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी येथील सर्व मुख्य मार्ग बंद करण्यात आले. जोपर्यंत ठाणेदार मोरे स्वत: आलापल्ली येऊन माफी मागणार तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. ठाणेदार मोरे यांनी या संदर्भात चर्चा करण्यासाठी काही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलविले. मात्र गावकऱ्यांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व ठाणेदार संजय मोरे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कोणतीही सूचना न देता पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यावेळी काही जणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी बळाचा वापर करून नाहक लाठीमार करून काही जणांना अटक केल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)
दोषींवर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
पोलिसांकडून काही नागरिकांवर लाठीमार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपला नागपूरचा दौरा रद्द करून गडचिरोलीवरून थेट आलापल्ली गाठली. त्यांनी गावकरी, व्यापारी यांच्याशी चर्चा केली व स्वत: पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून झालेल्या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. या प्रकरणात जे अधिकारी व कर्मचारी दोषी असतील त्यांची चौकशी करून दोन दिवसात कारवाई करावी. तसेच अटक केलेल्यांना पोलिसांनी तत्काळ सोडून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी दिले. नागरिकांनी स्वत:हून कोणताही कायदा हातात न घेता पोलिसांना मदत करावी, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून अटक केलेल्यांना नागरिकांना सोडून दिले.

Web Title: Police Strike in Alapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.