तोडगट्टामध्ये पोलिस-आंदोलक आमने-सामने; जवानांना धक्काबुक्की, आठ आंदोलक ताब्यात

By संजय तिपाले | Published: November 20, 2023 11:29 AM2023-11-20T11:29:36+5:302023-11-20T11:30:05+5:30

आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत आठ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलनस्थळावरील झोपड्याही तोडण्यात आल्या आहेत.

Police-Protesters Clash in Todgatta; Jawans were beaten, eight protesters were detained | तोडगट्टामध्ये पोलिस-आंदोलक आमने-सामने; जवानांना धक्काबुक्की, आठ आंदोलक ताब्यात

तोडगट्टामध्ये पोलिस-आंदोलक आमने-सामने; जवानांना धक्काबुक्की, आठ आंदोलक ताब्यात

गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे प्रस्तावित सहा लोहखाणींच्या विरोधात मागील आठ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी वांगीतुरी येथे पोलिस मदत केंद्र उघडण्यासाठी नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत होते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांशी अरेरावी केली. यावेळी पोलिस व आंदोलक समोरासमोर आले. आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत आठ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलनस्थळावरील झोपड्याही तोडण्यात आल्या आहेत.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे आदिवासींच्या प्रचंड विरोधानंतर लोहखनिज उत्खनन सुरू करण्यात आले आहे. याच तालुक्यात आता आणखी सहा लोहखाणी प्रस्तावित आहेत. मात्र, यामुळे जंगल उध्वस्त होत असून अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा दावा करत दमकोंडवाही बचाव संघर्ष समितीने २५० दिवसांपासून अतिदुर्गम तोडगट्टा येथे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी वांगीतुरी येथे पोलिस मदत केंद्र उघडण्यात येत आहे. यासाठी पोलिसांकडून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत होते. 

तोडगट्टा आंदोलन स्थळापासून जवळच असलेल्या वांगीतुरीला निघालेल्या पोलिसांना आंदोलकांनी अडविले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घातली व धक्काबुक्की केली, त्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलकांचा विरोध मोडून काढला. यानंतर प्रदीप हेडो, मंगेश नरोटी, साई कवडो, महादू कवडो, निकेश नरोटी आणि गणेश कोरिया अशा प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्या सर्वांना हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणले आहे.

पोलिसांनी बळाचा वापर केला नाही
दरम्यान, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, वांगीतुरी येथे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यासाठी नक्षलविरोधी अभियान सुरू होते. वांगीतुरीला जाताना जवानांना आंदोलकांनी अडविले व धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्यानंतर काही जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, बळाचा वापर केला नाही. स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात तेथे होते त्यांनीच आंदोलनस्थळी झोपड्या मोडल्या, असा दावा त्यांनी केला.

विकासकामांना विरोध करत हे आंदोलन सुरू होते. वांगीतुरी येथे पोलिस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. यादरम्यान आंदोलकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. सध्या तेथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
- संदीप पाटील, उप पोलिस महानिरीक्षक

Web Title: Police-Protesters Clash in Todgatta; Jawans were beaten, eight protesters were detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.