पोलीस अधिकारी नक्षल्यांच्या दारी

By Admin | Updated: December 2, 2015 01:39 IST2015-12-02T01:35:51+5:302015-12-02T01:39:44+5:30

जिल्हा पोलीस व पोलीस उपविभाग धानोराच्या वतीने नवजीवन अभियान राबविण्यात येत आहे. दरम्यान, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत ठिके ...

Police officers | पोलीस अधिकारी नक्षल्यांच्या दारी

पोलीस अधिकारी नक्षल्यांच्या दारी

नवजीवन अभियान : कनाळ, शिवागाटाला दिली भेट; नक्षल कुटुंबीयांना भेट वस्तू प्रदान
धानोरा : जिल्हा पोलीस व पोलीस उपविभाग धानोराच्या वतीने नवजीवन अभियान राबविण्यात येत आहे. दरम्यान, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत ठिके यांनी सोमवारी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील कनाळ (रांगी) व शिवागाटा गावाला भेट दिली. तेथील नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांना भेटवस्तू प्रदान केली.
कनाळ (रांगी) येथील देवनाथ नवलू बोगा (३०) हा नक्षल दलमच्या वरिष्ठ कॅडरमध्ये काम करीत आहे. तर शिवागाटा येथील संतोष ऊर्फ मोहन ऊर्फ रावणशाह सदुराम कुरचामी हाही नक्षल संघटनेत काम करीत आहेत. धानोचा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सोमवारी कनाळ व शिवागाटा येथे जाऊन नक्षल सदस्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी कनाळ येथे नक्षल सदस्य देवनाथ बोगा याची आई, भाऊ व वहिनी उपस्थित होते. देवनाथ बोगा हा रांगी येथे १२ वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. एकदा घरी आल्यानंतर तो अचानक नक्षल दलममध्ये निघून गेला. त्याला नक्षल दलममध्ये सहभागी होऊन आता २२ वर्षे झाली आहेत, अशी माहिती देवनाथच्या आई व भावाने पोलीस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी ठिके यांनी त्याच्या कुटुंबीयाला नक्षल आत्मसमर्पण योजनेची माहिती दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवागाटा येथे भेट दिली असता नक्षल सदस्य संतोष कुरचामी याची आई, बहीण व नागरिक उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ठिके यांनी त्याच्या कुटुंबीयाला आत्मसमर्पण योजनेची माहिती दिली व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. दोन्ही गावातील नक्षल कुटुंबीयांना भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या. दरम्यान, एसडीपीओ ठिके यांनी गावातील नागरिकांशी विविध मुद्यांवर चर्चा केली. तसेच गावातील समस्यांबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी धानोराचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.