पोलीस फौज निवडणुकीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 01:08 IST2017-02-19T01:08:44+5:302017-02-19T01:08:44+5:30
सिरोंचा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली

पोलीस फौज निवडणुकीसाठी सज्ज
चारही तालुक्यांत कामाला वेग : सिरोंचा तालुक्यात १ हजार ६०० जवान तैनात राहणार
आनंद मांडवे सिरोंचा
सिरोंचा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून रविवारी बहुतांश पोलिंग पार्ट्या तालुकास्थळावरून रवाना होणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सिरोंचा तालुक्यातील ३१ मतदान केंद्र संवेदनशील, ३७ मतदान केंद्र अतिसंवेदनशील व १० मतदान केंद्र साधारण आहेत. संपूर्ण तालुक्यात निवडणुकीसाठी सुमारे १६०० पोलीस जवानांचा ताफा तैनात केला जाणार आहे. यासाठी पोलीस विभागाचे नियोजन पूर्ण झाले आहे.
सिरोंचा तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्र व आठ पंचायत समिती गणांसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. तालुक्यातील २१ हजार ३११ महिला मतदार व २२ हजार ६७ पुरूष मतदार असे एकूण ४३ हजार ३७८ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायती १३९ गावे यामध्ये समाविष्ट आहेत. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, आसरअल्ली, अंकिसा भागातील बहुतांश मतदान केंद्रे नक्षलदृष्ट्या संवेदनशील मानली जातात. निवडणुकीच्या दरम्यान नक्षल्यांकडून घातपाताची घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणुकीदरम्यान पोलीस विभागाने अतिरिक्त कुमक सिरोंचा तालुक्यात तैनात केली आहे. काही ठिकाणी हेलिकॉप्टरच्या मदतीने पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याचाही निर्णय पोलीस विभागाने घेतला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या १२ कंपन्या, सहा भूसुरूंग शोधक पथकांनी सिरोंचा पोलीस ठाण्याच्या आवारात बस्तान मांडले आहे. याशिवाय स्थानिक पोलीस अधिकारी, गृहरक्षक दलाचे १०० जवानही निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. संपूर्ण सिरोंचा तालुक्यात १ हजार ६०० पोलीस जवानांचा ताफा तैनात केला जाणार आहे. या पोलीस जवानांच्या निवासासाठी भव्य शामियांना उभारण्यात येत आहे. महसूल विभागाने एकूण २० वाहने अधिग्रहित केली आहेत. यात राज्य परिवहन महामंडळाच्या पाच बसेस, नऊ मॅक्सीकॅब, सहा शासकीय वाहने यांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी ३०४ कर्मचारी मतदान केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. यापैकी ४० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. आठ झोनल अधिकारी बेस कॅम्प अंतर्गत नियुक्त राहतील. यासाठी त्यांच्या दिमतीला सहा शासकीय व दोन खासगी वाहने राहणार आहेत, अशी माहिती महसूल विभागाच्या निवडणूक कक्षाने दिली आहे.