देसाईगंजात भरधाव ट्रकने पोलीस शिपायाला चिरडले
By Admin | Updated: January 21, 2017 01:52 IST2017-01-21T01:52:24+5:302017-01-21T01:52:24+5:30
भरधाव वेगाने मार्गक्रमण करीत असलेल्या एका ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने घडलेल्या

देसाईगंजात भरधाव ट्रकने पोलीस शिपायाला चिरडले
पोलीस चौकीसमोर अपघात : जागीच मृत्यू; एक जखमी
देसाईगंज : भरधाव वेगाने मार्गक्रमण करीत असलेल्या एका ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने घडलेल्या अपघातात कुरखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई जागीच ठार झाला. त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. अंगाचा थरकाप उडणारा अपघात शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास देसार्ईगंज येथील बसस्थानकासमोरील पोलीस चौकीसमोर घडला.
नानाजी झुरे (५३) रा. कुरूड असे मृतकाचे नाव असून ते पोलीस शिपाई म्हणून कुरखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील रहिवासी असलेले नानाजी झुरे हे आपला पुतन्या तिर्थपाल झुरे (३८) याच्यासोबत दुचाकीने कुरखेडाला जात होते. दरम्यान देसाईगंज शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या पोलीस चौकीसमोर त्यांच्या एमएच ३३ बी ६४५६ क्रमांकाच्या दुचाकीला मागहून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४० एन २८१७ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील तिर्र्थपाल झुरे हे दूरवर फेकल्या गेले. ते किरकोळ जखमी झाले. तर नानाजी झुरे यांच्या शरिरावरून ट्रक गेला. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक घटनास्थळीच ठेऊन पळ काढला. याबाबत देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, देसाईगंज शहरात शुक्रवारी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली होती व मार्गदर्शनपर कार्यक्रमही घेण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या काही वेळातच हा अपघात घडला. (शहर प्रतिनिधी)
अतिक्रमणामुळे वाढले अपघात
देसाईगंज शहरातील बसस्थानक हे नेहमी वर्दळीचे ठिकाण आहे. या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या बाजुला अतिक्रमण करून दुकानदारांनी दुकाने थाटली आहेत. काही दुकाने मुख्य रस्त्यावर चार ते पाच फूट समोर आली आहेत. अतिक्रमणामुळे रस्ता अरूंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी साहित्य खरेदी करणारे ग्राहक रस्त्यावरच दुचाकी वाहने ठेवतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. सदर अतिक्रमण हटविण्याचा फार्स नगर परिषदेने अनेकदा केला. मात्र कायमस्वरूपी अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर अतिक्रमण हटवावे, अशी संतप्त प्रतिक्रिया देसाईगंजवासीयांनी व्यक्त केली आहे.