पोलिसांनी वाहनासहीत चार लाखांचा दारूसाठा पकडला
By Admin | Updated: August 23, 2015 01:50 IST2015-08-23T01:50:54+5:302015-08-23T01:50:54+5:30
दारूची अवैध विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारे देसाईगंज, चामोर्शी व घोट पोलिसांनी गुरूवारी व शुक्रवारी धाड टाकून वाहनासहीत ४ लाख २४ हजार रूपयांचा अवैध दारूसाठा पकडला.

पोलिसांनी वाहनासहीत चार लाखांचा दारूसाठा पकडला
तीन आरोपींना अटक : देसाईगंज, चामोर्शी, घोट पोलिसांची कारवाई
चामोर्शी/देसाईगंज/घोट : दारूची अवैध विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारे देसाईगंज, चामोर्शी व घोट पोलिसांनी गुरूवारी व शुक्रवारी धाड टाकून वाहनासहीत ४ लाख २४ हजार रूपयांचा अवैध दारूसाठा पकडला.
सिल्वर रंगाचे चारचाकी वाहन दारू भरून भेंडाळा मार्गे जयरामपूरकडे जात असल्याची गोपनीय माहिती चामोर्शी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दुलाल मंडल यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भेंडाळा मार्गावर गस्त घातली. दरम्यान गणपूर गावाजवळ भेंडाळा मार्गाने एमएच-३०-एल-९४६५ ही कार येताना दिसली. सदर वाहनाचा पाठलाग करून जयरामपूर गावालगतच्या नाल्यावर सदर वाहनाला पोलिसांनी अडविले. वाहनचालक अजय अशोक शेंडे रा. नागपूर याला खाली उतरवून वाहनाची झडती घेतली. दरम्यान, या वाहनात १८० एमएम मापाच्या विदेशी दारूच्या ७२० सीलबंद निपा आढळून आल्या. या दारूची किंमत २ लाख १६ हजार व दीड लाख रूपयांचे वाहन असा एकूण पोलिसांनी ३ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अजय अशोक शेंडे (३७) रा. मानेवाडा नागपूर याला अटक करून त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुहेल पठाण यांच्या पथकाने लाखांदूर येथून गडचिरोली व चंद्रपूरकडे आयात होणारी ११ हजार ४०० रूपयांची अवैध दारू जप्त केली व याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी देसाईगंज पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतल्यापासून देसाईगंज पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३२ दारूविक्रेत्या आरोपींवर गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे. या सर्व आरोपींकडून वाहनासहीत पोलिसांकडून ३ लाख ९७ हजार ३४७ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. देसाईगंज पोलिसांच्या धडक कारवाईमुळे देसाईगंज तालुक्यातील अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
घोट पोलिसांनी मुलचेरा तालुक्यात कालीनगर येथे निरंजन हलदर यांच्या शेतात धाड टाकून त्याच्याकडून ४१ हजार रूपये किमतीची ४१० लिटर मोहफुलाची दारू व ३६ हजार रूपये किंमतीचे सहा क्विंटल मोहफुलाचा सडवा तसेच दारू काढण्याचे साहित्य जप्त केले. त्याचेकडून एकूण ७७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. निरंजन क्रिष्णकांत हलदर (४५) याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.