१७४ आरोपींवर पोलीस कारवाई
By Admin | Updated: May 6, 2015 01:35 IST2015-05-06T01:35:10+5:302015-05-06T01:35:10+5:30
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहर ठाण्यात कार्यरत पोलिसांनी सन २०१४-१५ या वर्षात ..

१७४ आरोपींवर पोलीस कारवाई
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहर ठाण्यात कार्यरत पोलिसांनी सन २०१४-१५ या वर्षात विविध प्रकारच्या १५५ गुन्ह्यांची नोंद करून एकूण १७४ आरोपींवर कायदेशीर पोलीस कारवाई केली आहे. अपघाती मृत्यूचे एकूण २८ गुन्हे नोंद करून इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ३८ बेजबाबदार वाहन चालकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गडचिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सहा बिट असून यामध्ये गडचिरोली शहर कॉम्प्लेक्स, पोर्ला, गोकुलनगर/रामनगर, अमिर्झा व येवली बिटांचा समावेश आहे. दोन बिटामध्ये शहराचा समावेश असून तिसऱ्या बिटात कॉम्प्लेक्स परिसरातील गावांचा समावेश आहे. उर्वरित बिट मिळून एकूण ७५ गावांचा भार गडचिरोली पोलीस ठाण्यावर आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध प्रकारचे अनेक गुन्हे घडत असतात. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून आरोपींवर कारवाई करण्याचे काम पोलीस ठाण्याच्या वतीने होत असते. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या वर्षभराच्या कालावधीत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनयभंगाचे सात गुन्हे घडले असून पोलिसांनी आठ आरोपींवर कारवाई केली आहे.
बलात्काराचे चार गुन्हे घडले असून चार आरोपींवर कारवाई झाली आहे. चोरीचे ३१ गुन्हे घडले असून नऊ आरोपींवर कारवाई झाली आहे. महिलांवरील अत्याचार, किरकोळ अपघात शिविगाळ बाबतचे एकूण ३६ गुन्हे घडले असून ४६ आरोपींवर कायदेशीर कारवाई झाली आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारहाणीतून दुखापत झाल्याचे ११ गुन्हे घडले असून २१ आरोपींवर कारवाई झाली असल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून १४ लाखांचा दंड वसूल
वाहतूक शाखा गडचिरोलीच्या वतीने १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या एक वर्षाच्या कालावधीत अवैध वाहतुकी प्रकरणी एकूण १२ हजार १२१ गुन्हे दाखल करण्यात आले. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १२ हजार १२१ वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांनी एकूण १४ लाख ५९ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
शहर वाहतूक पोलिसांनी परवाना क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतुकीप्रकरणी १३० गुन्हे नोंदविले असून वर्षभरात एक लाख ४५ हजार ६०० रूपयांचा दंड वाहनचालकांकडून वसूल केला आहे.
परवाना कागदपत्रे तसेच नंबर प्लेट, हेल्मेट नसलेल्या व ओव्हरलोड वाहतुकी संदर्भात वर्षभरात ११ हजार ९९१ गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातून वर्षभरात १३ लाख १३ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.