भूखंड वाटले मात्र उद्योगांचा पत्ता नाही
By Admin | Updated: December 20, 2014 01:35 IST2014-12-20T01:35:38+5:302014-12-20T01:35:38+5:30
स्थानिक औद्योगिक विकास महामंडळाने १७ उद्योजक कंपन्यांना २८ हजार ५८० चौ. मिटर भूखंडाचे वाटप चार महिन्यांपूर्वी केले.

भूखंड वाटले मात्र उद्योगांचा पत्ता नाही
गडचिरोली : स्थानिक औद्योगिक विकास महामंडळाने १७ उद्योजक कंपन्यांना २८ हजार ५८० चौ. मिटर भूखंडाचे वाटप चार महिन्यांपूर्वी केले. मात्र या उद्योजक कंपन्यांनी अजूनपर्यंत या ठिकाणी उद्योग निर्माण करण्याच्या हालचालीसुध्दा सुरू केल्या नाहीत.
उद्योग निर्मितीसाठी जमीन वाहतुकीची सुविधा, ऊर्जा साधणे व मनुष्यबळ अत्यंत महत्त्वाचा आहे. या चारही बाबी एका ठिकाणी मिळणे अशक्य असल्याने उद्योग निर्मितीत अडचणी निर्माण होतात. या समस्या उद्योजकाला निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाने एमआयडीसीची स्थापना केली आहे. गडचिरोली येथील एमआयडीसी शहराच्या अगदी जवळ आहे. एमआयडीसीसाठी शेकडो एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे.
गडचिरोली येथील एमआयडीसीमध्ये एकूण १४८ भूखंड आहेत. उद्योग निर्मितीसाठी १७ उद्योजक कंपन्यांनी सहा महिन्यापूर्वी भूखंडांची मागणी केली होती. बऱ्याच दिवसानंतर उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्याचे लक्षात घेऊन एमआयडीसीच्या प्रशासनाने सर्वच कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर केले व त्यांना भूखंडांचे वाटप केले. १७ उद्योजकांना २८ हजार ५८० चौरस मिटर जागेचे वाटप केले.
भूखंडांचे वाटप करून चार महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. यापैकी एकाही उद्योजकांनी उद्योग स्थापण करण्यासाठी हालचाल सुरू केली नाही, असे सध्या चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी गडचिरोली एमआयडीसीतील बरीचशी जागाही सीआरपीएफला लीजवर देण्यात आली होती. त्यावेळी लघू उद्योजकांनी मोठी ओरड केली होती. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत १७ उद्योजकांना भूखंड वितरित करण्यात आल्याची ही आनंदायी बाब ठरणार आहे. हे उद्योग सुरू झाल्यास येथे काही प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशी आशा आहे.