जिमलगट्टाच्या मंडळ कार्यालयाची दुर्दशा
By Admin | Updated: August 1, 2016 01:27 IST2016-08-01T01:27:35+5:302016-08-01T01:27:35+5:30
मागील चार वर्षांपासून अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे मंडळ कार्यालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

जिमलगट्टाच्या मंडळ कार्यालयाची दुर्दशा
पाच वर्षानंतरही काम अपूर्णच : २०११ मध्ये झाले होते भूमिपूजन
संजय गज्जलवार जिमलगट्टा
मागील चार वर्षांपासून अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे मंडळ कार्यालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ते अजूनही पूर्ण झालेले नाही. बांधकाम सुरू असलेली ही इमारत जनावरांचा अड्डा झाली आहे. या इमारतीच्या सर्व खोल्यांमध्ये शेण भरलेले असून एका खोलीमध्ये जनावरांसाठी गवताची सोय करून ठेवण्यात आली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली अंतर्गत जिमलगट्टा येथे ३.५० कोटी रूपये खर्च करून महसूल विभागाच्या मंडळ कार्यालयाची इमारत बांधण्यात येत आहे. सन २०११ मध्ये या इमारतीच्या बांधमाकाचे भूमीपूजन करण्यात आले. पाच वर्षांत या इमारतीचे बांधकाम अपूर्णावस्थेतच आहे. सध्या ही इमारत मोकाट जनावरांचा अड्डा झाली आहे. तेथे जनावरे वावरताना दिसून येतात. प्रत्येक निवासस्थानात रात्रभर जनावरे राहत असल्याने पूर्ण इमारत शेणाने भरले आहे. संडास, बाथरूम व रूमची दुर्दशा झाली आहे. टाईल्स फुटलेल्या आहेत. पायऱ्या तुटलेल्या आहेत. उद्घाटनापूर्वीच इमारत जीर्णावस्थेत असल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी ४० मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. मात्र अर्ध्याअधिक इमारतीचे काम अद्यापही अपूर्ण आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
स्वच्छतेची ऐसी तैसी
अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथील मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प आहे. परिणामी या इमारतीच्या शौचालयात प्रचंड अस्वच्छ पसरली असून सर्वत्र घाण आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून सदर अपूर्ण इमारत अडगळीत पडली आहे.