कोतवाल पदभरती प्रक्रियेची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:45 IST2017-09-23T21:44:58+5:302017-09-23T21:45:13+5:30
तालुक्यातील साजा क्रमांक १२ च्या कोतवाल पदभरतीच्या लेखी परीक्षेत आपण प्रथम येऊनही व तोंडी परीक्षेत विचारलेल्या सर्वच प्रश्नांची बिनचूक व अचूक उत्तरे देऊनही आपल्याला तोंडी परीक्षेत कमी गुण देण्यात आले.

कोतवाल पदभरती प्रक्रियेची चौकशी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील साजा क्रमांक १२ च्या कोतवाल पदभरतीच्या लेखी परीक्षेत आपण प्रथम येऊनही व तोंडी परीक्षेत विचारलेल्या सर्वच प्रश्नांची बिनचूक व अचूक उत्तरे देऊनही आपल्याला तोंडी परीक्षेत कमी गुण देण्यात आले. कोतवाल निवडीसाठी आपण पात्र असूनही अन्याय करण्यात आला. त्यामुळे कोतवाल पदभरतीला स्थगिती देऊन या प्रक्रियेची चौकशी करावी व आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी कुलकुली येथील खिरूताई भानारकर यांनी शुक्रवारी आरमोरी येथे पत्रकार परिषदेतून केली.
भाकरोंडी साजा क्रमांक १२ च्या कोतवाल पदभरतीसाठी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज भरले. १० सप्टेंबरला कोतवाल पदभरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेत आपल्याला प्रथम क्रमांकाचे गुण मिळाले. १४ सप्टेंबर २०१७ ला आपल्याला तोंडी परीक्षेसाठी पाचारण करण्यात आले. तोंडी परीक्षेत विचारलेल्या सर्व प्रश्नांची बिनचूक उत्तरे दिली. तरी सुद्धा या परीक्षेत हेतुपुरस्सर मला कमी गुण देऊन माझ्यावर अन्याय करण्यात आला. मला कोतवाल निवडीपासून बाद करण्यात आले. ज्या उमेदवाराची निवड झाली, तिचे पती देखील कोतवाल आहेत. सदर कोतवाल भरतीत गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप करीत कोतवाल पदभरती प्रक्रियेला स्थगिती देऊन या प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी खिरूताई भानारकर यांनी पत्रकार परिषदेतून केली. याप्रसंगी अनिल सहारे, रोहिदास सहारे, जगदीश रामटेके उपस्थित होते.