जिल्हा विकासात मोलाची भूमिका बजावा
By Admin | Updated: June 29, 2015 02:12 IST2015-06-29T02:12:28+5:302015-06-29T02:12:28+5:30
जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार तसेच आम्ही लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहोत.

जिल्हा विकासात मोलाची भूमिका बजावा
मेळावा व सत्कार कार्यक्रम : अशोक नेते यांचे प्रतिपादन
गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार तसेच आम्ही लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्याचा शाश्वत व गतीने विकास होण्यासाठी संशोधन व कार्यान्वयन संस्थेने शासन व प्रशासनाकडे सूचना केल्या पाहिजेत. जिल्हा विकासात संशोधन संस्थेने मोलाची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.
जिल्हा विकास संशोधन व कार्यान्वयन संस्थेच्या वतीने रविवारी आयोजित मेळावा व सत्कार कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. मारोतराव कोवासे होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हसनअली गिलानी, नगराध्यक्ष निर्मला मडके, नामदेवराव गडपल्लीवार, सत्यम चकीनारप, मनोहर हेपट, संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, कार्याध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी देवराव भोगेवार, विलास निंबोरकर, सदाशिव निंबोरकर तसेच सदस्य मुकुंदा कुळमेथे, गजानन राऊत, घनश्याम जेंगठे, वनिता बांबोळे, मंजु विष्णोई, वर्षा शेडमाके आदींनी सहकार्य केले.
खा. अशोक नेते, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, नगराध्यक्ष निर्मला मडके, माजी खा. मारोतराव कोवासे व माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी व बारावीत जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संचालन सुरेश मांडवगडे, प्रास्ताविक मनोहर हेपट यांनी केले तर आभार डी. डी. सोनटक्के यांनी मानले. (प्रतिनिधी)