नाल्यांमध्ये प्लॅस्टिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:38+5:302021-04-19T04:33:38+5:30
देसाईगंज : नगरपालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लॅस्टिक पन्न्यांचा वापर करतात. अनेक जण दुकान ...

नाल्यांमध्ये प्लॅस्टिक
देसाईगंज : नगरपालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लॅस्टिक पन्न्यांचा वापर करतात. अनेक जण दुकान बंद झाल्यानंतर या पन्न्या व प्लॅस्टिक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकून देतात. त्यामुळे नाल्या तुंबल्या असून, सांडपाणी जमा होत आहे.
जनजागृतीचा अभाव
आष्टी : केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अटल पेंशन योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात या योजनेबाबत जनजागृती नाही. त्यामुळे या याेजनेचा लाभ मिळण्यास अडचणी आहेत.
औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत.
ट्रॅक्टरचालकांसाठी परवाना शिबिराची गरज
एटापल्ली : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. पाच वर्षांत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारकांसाठी शिबिराची गरज आहे.
बॉयोमेट्रिक मशीन बंद, कर्मचारी बिनधास्त
आलापल्ली : अहेरी तालुका मुख्यालयातील शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बॉयोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत.
वसाचा निवारा जीर्ण
गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्यांचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मातीचे बंधारे बांधा
आलापल्ली : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.
स्वच्छतेचा पडला विसर
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक कार्यालयात पसरलेल्या घाणीमुळे शासकीय कार्यालयातील स्वच्छता पाळण्याच्या प्रयत्नाला हरताळ फासला आहे. अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली असल्याने या ठिकाणी बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
खाऊचा दर्जा खालावला
अहेरी : अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविल्या जातो. मात्र मागील काही दिवसांपासून या शालेय पोषण आहाराचा दर्जा घसरत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थी सदर पोषण आहार खात नाही. परिणामी पोषण आहार बाहेर फेकून द्यावा लागतो. आहाराच्या दर्जाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.
गतिरोधकाची गरज
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी गतिराेधकाचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.
चाैकातील फलक हटवा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे सदर फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी आहे.
दवाखान्याची दुरवस्था
भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी हाेत आहे.
कचरा व्यवस्थापन करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.