दोन लाख हेक्टर क्षेत्राच्या पीक लागवडीचे नियोजन
By Admin | Updated: April 30, 2015 01:37 IST2015-04-30T01:37:05+5:302015-04-30T01:37:05+5:30
जिल्ह्यातही बाराही तालुके मिळून खरीप हंगामातील सर्व पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ६६ हजार २०० इतके आहे.

दोन लाख हेक्टर क्षेत्राच्या पीक लागवडीचे नियोजन
गडचिरोली : जिल्ह्यातही बाराही तालुके मिळून खरीप हंगामातील सर्व पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ६६ हजार २०० इतके आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने २०१५-१६ या वर्षाचा खरीप पिकाचा नियोजन आराखडा तयार केला असून या आराखड्यांचा जिल्ह्यात दोन लाख हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड होणार आहे.
जिल्ह्यात बाराही तालुके मिळून धान पिकाचे एक लाख ४९ हजार ३०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. २०१३-१५ या वर्षात एक लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. २०१४-१५ या वर्षात एक लाख ७५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा २०१५-१६ या वर्षात एकूण एक लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्राच्या धान पिकांच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रती हेक्टरी १३ क्विंटल धान पीक घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. जिल्ह्यातील खरीप पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने बियाणे व खते आदीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून सवलतीवर सदर बियाणे व खते पुरविण्यात येणार आहे, यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभागानेही पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. धान पिकाची जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान पिकासोबतच ज्वारी मक्का, तूर, मूग, उडीद, भूईमूग, तीळ, सोयाबीन, एरंडी तसेच कापूस व ऊस पिकाची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. इतर पिकाच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केल्या जात आहे. या संदर्भात जनजागृती सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)